भांगडा...बिहू... काश्मिरी रौफमधून शाहूरायांना वंदन; देशातील 11 राज्याच्या लोककलांचा आविष्कार | पुढारी

भांगडा...बिहू... काश्मिरी रौफमधून शाहूरायांना वंदन; देशातील 11 राज्याच्या लोककलांचा आविष्कार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पंजाबचा भांगडा… आसामचा बिहू….गुजाराथी सिद्दी धमाल…हरियानवी घुमर नृत्यांच्या रंगारंग सादरीकरणाने देशभरातून आलेल्या 209 कलाकारांनी राजर्षी शाहूरायांना वंदन केले. राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वांतर्गत रविवारी शाहू मिलच्या सभागृहात हा बहारदार कार्यक्रम झाला. देशभरातील 11 राज्यांतून आलेल्या लोकनृत्य कलाकारांना करवीरवासीयांनीही भरभरून दाद दिली.

राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दीनिमित्त होत असलेल्या कृतज्ञता पर्वांतर्गत रविवारी देशभरातील 11 राज्यांतून वादक करवीरनगरीत दाखल झाले होते. महाराष्ट्रातील पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे, लावणी यासह काश्मीरचे रौफ नृत्य, छत्तीसगडचे पंथी नृत्य, कर्नाटकचे हालाकी सुग्गी कुनिथा, आसामचे बिहू नृत्य, मध्यप्रदेशचे गुदुम बाजा, हरियाणाचे घुमर नृत्य, पंजाबी भांगडा, गुजराथी सिद्दी धमाल या नृत्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

रविवारी सायंकाळी शाहू मिलच्या 10 नंबर सभागृहामध्ये शाहू गाथा व गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पोवाडा सादर करण्यात आला. यानंतर देशभरातून आलेल्या या लोककलांचे बहारदार सादरीकरण झाले. यानंतर सर्व 209 कलाकारांचा सहभाग असणारे व राजर्षी शाहू महाराजांना वंदन करणारा कलाविष्कार सादर करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय, दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, जिल्हा प्रशासन व राजर्षी शाहू फौंडेशन यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम सादर झाला.

Back to top button