शाळा आवार आजपासून गजबजणार; पहिल्या दिवसापासून गणवेश सक्‍ती | पुढारी

शाळा आवार आजपासून गजबजणार; पहिल्या दिवसापासून गणवेश सक्‍ती

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : तब्बल 44 दिवस असलेली उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून शाळांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे शाळांचा परिसर गजबजणार आहे. पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्यात आली आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पंधरा दिवस सवलत असणार आहे.

पहिल्याच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असून शाळांमधून तयारी करण्यात आली आहे. कर्नाटक शिक्षण विभागाने 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले असून यंदा शैक्षणिक वर्षात 270 दिवस शैक्षणिक कामासाठी दिले जाणार आहेत. वेळापत्रकात दसर्‍याची सुट्टी 14 दिवसांची जाहीर करण्यात आली आहे.

सोमवारी सुट्टीचा अभ्यास तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे वह्या आणणे गरजेचे आहे. जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणणे आवश्यक आहे. पालकांचा फोन नंबर किंवा पत्ता बदललेला असेल तर कागदावर लिहून मुलांकडून पाठवून देण्यबरोबर वर्दीच्या रिक्षांनी येणार्‍या मुलांनी रिक्षाचालकाचा फोन नंबर, आधारकार्ड झेरॉक्स व सध्याचा पत्ता लिहून दोन दिवसांत वर्गशिक्षकांकडे देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांनी पालकांना केल्या आहेत.

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात झुंबड

सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यामुळे पालकांनी शनिवारपासून शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट खरेदी करण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे बाजारात गर्दी झाली होती.

खासगी शाळांमधून शैक्षणिक साहित्याची यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांना देण्यात आली आहे. सरकारी शाळांमध्ये सोमवारी शैक्षणिक साहित्याची यादी देण्यात येणार आहे. तयार गणवेश, बूट खरेदीवर पालक भर देत आहेत. खासगी शाळांमधून शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे कापड खरेदी करणे सक्तीचे केल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button