बेळगाव

बसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

दीपक दि. भांदिगरे

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी आज बुधवारी (दि.२८) शपथ घेतली. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे ३० वे मुख्यमंत्री बनले आहे. तीन वेळा आमदार, गृहमंत्री ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

स्वच्छ राजकारणी, प्रभावी लिंगायत नेते, दीर्घ राजकीय अनुभव असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. येडियुराप्पांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी आज राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि कर्नाटक भाजपचे प्रभारी अर्जुन सिंह उपस्थित होते.

बसवराज बोम्मई यांच्या शपथविधीदरम्यान राजभवनाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या हावेरी जिल्ह्यातील शिगगाव मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी यावेळी त्यांच्या नावाचा जयघोष केला.

शिगगाव हे बंगळूर पासून ३६५ किलोमीटर अंतरावर आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्याबद्दल बोम्मई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रेष्ठींच्या सूचनेनुसार येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सुमारे अर्धा डझन नेत्यांनी नवी दिल्‍लीपर्यंत लॉबिंग केले होते; पण येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय असणारे बसवराज बोम्मई यांना संधी देण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी, आमदार अरविंद बेल्‍लद, भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी, आमदार मुरुगेश निराणी यांच्यासह काहीजण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे येडियुराप्पांचा पदत्याग

बी. एस. येडियुराप्पा यांचे उतारवय आणि त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजप श्रेष्ठींनी त्यांना पद सोडण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांनी पदत्याग केला. त्यांच्यासह मंत्रिमंडळही विसर्जित झाले. आता नवे मंत्रिमंडळ स्थापन होत आहे. याआधीच्या मंत्रिमंडळात असणार्‍या काही अकार्यक्षम आणि वयस्कर आमदारांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT