बेळगाव

इतर स्पर्धा परीक्षांमध्येही गैरव्यवहार?; संशयितांच्या चौकशीतून उघड

अनुराधा कोरवी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : केवळ पोलिस उपनिरीक्षक पदच नव्हे तर एफडीए, एसडीए, सहायक अभियंता पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्येही संशयित रुद्रेगौडा डी. पाटील व इतरांनी गैरव्यवहार केल्याचा संशय सीआयडीने व्यक्‍त केला आहे.

पीएसआय परीक्षा प्रकरणात रुद्रेगौडा पाटील हा मुख्य संशयित आहे. त्याच्यासह त्याचा मित्र मल्लिकार्जुन (मल्लूगौडा) पाटील यालाही अटक केली आहे. त्या दोघांची सीआयडी अधिकार्‍यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर काही स्फोटक माहिती मिळाल्याचे समजते. रुद्रेगौडाच्या घरामध्ये 35 हॉलतिकीट आढळले. परीक्षा सुरू होण्याआधीच प्रश्‍नपत्रिका फुटल्याचा तपास सीआयडीने लावला आहे.

रुद्रेगौडा याने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून उमेदवारांना प्रश्‍नांची उत्तरे पुरवली. परीक्षेच्या दिवशी तो इतर राज्यांमध्ये जात होता. अशा गैरव्यवहाराच्या आधारे सुमारे 30 जणांनी सरकारी नोकरी मिळवल्याची माहिती उघडकीस आली आहे. गुलबर्गा येथील पाटबंधारे खात्याचे सहायक अभियंता मंजुनाथ मेळकुंदी यांच्या घरावर छाप्यावेळी 10 उमेदवारांची हॉल तिकिटे सापडली होती. संबंधित उमेदवारांना अटक करून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची आणखी माहिती उघड होणार आहे.

आ. प्रियांक खर्गेंना सीआयडी नोटीस

पोलिस उपनिरीक्षक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडी अधिकार्‍यांनी काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांना नोटीस बजावली आहे. याविरुद्ध त्यांनी संतप्‍त प्रतिक्रिया दिली असून संशयितांना सोडून गैरव्यवहार उघडकीस आणणार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप केला. केपीसीसी कार्यालयात आयोजित पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, पीएसआय नियुक्‍तीसाठी गृहमंत्री प्रमुख असतात. त्यांची चौकशी का केली नाही? या प्रकरणातील संशयित आणि भाजप नेत्या दिव्या हागरगी यांना अजूनही का नोटीस बजावली नाही? नियुक्‍ती करणार्‍यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

गृहमंत्र्यांनी संशयितांच्या घरी जाऊन सत्कार करून घेतला. संशयितांच्या बदामी येथील घरी जाऊन त्यांनी काजू खाल्ले. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात यावी. ऑडिओ जाहीर केल्यानंतर आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही पुरावे सादर केल्यानंतरही संशयितांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कर्तव्य पार पाडलेले नाही. मंत्री सुनीलकुमार प्रियांक यांची चौकशी करावी, अशी मागणी करत आहेत. त्याचवेळी ते स्वत: गृहमंत्र्यांसोबत संशयितांच्या घरी जाऊन आल्याचे पुरावे असल्याचा दावा प्रियांक खर्गे यांनी केला.

हेही वाचलंत का? 

सीआयडीने आ. प्रियांक यांना नोटीस बजावली आहे. माहिती देणार्‍यांनाच नोटीस देणे योग्य नाही. त्यांना चौकशीला जाण्याची परवानगी देणार नाही. पुढे काय होईल ते पाहिले जाईल.
– डी. के. शिवकुमार (अध्यक्ष, कर्नाटक प्रदेश काँग्रेस)

पीएसआय परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी काँग्रेसचे आ. प्रियांक खर्गे यांनी काही पुरावे जाहीर केले आहेत. त्यांनी सर्व पुरावे सीआयडीकडे द्यावेत. यामुळे योग्य दिशेने तपास करता येईल.
– अरग ज्ञानेंद्र गृहमंत्री

SCROLL FOR NEXT