नाशिक : ‘कडवा’चे दोष दुरुस्त करून दररोज पाणी द्या - आ. कोकाटे यांच्या सूचना | पुढारी

नाशिक : ‘कडवा’चे दोष दुरुस्त करून दररोज पाणी द्या - आ. कोकाटे यांच्या सूचना

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
कडवा पाणीपुरवठा योजनेतील दोष तत्काळ दुरुस्त करून शहरवासीयांना दररोज पाणी द्या, तसेच पाणीचोरीचे करणारे कनेक्शन तोडून कारवाई करा. कडवा धरणात मुबलक पाणी आहे. त्यामुळे शहरवासीयांना रोज पाणी द्या, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांना केल्या.

शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कोकाटे यांनी नगर परिषदेत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, मुख्याधिकारी संजय केदार, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता आर. डी. डोंगरे, उपविभागीय अभियंता सचिन पवार, नगर परिषद पाणीपुरठा अभियंता हेमलता दसरे, नगररचनाच्या सायली राठी आदी उपस्थित होते.

कडवासह दारणा योजनेतून पाणी उचलूनही शहर व उपनगरांना पाणी मिळत नसल्याने दररोज उचलल्या जाणार्‍या व आवश्यक पाण्याचा आमदार कोकाटे हिशेब मागितला. मात्र मुख्याधिकारी केदार व अभियंता दसरे यांनी वीजपुरवठ्यातील विस्कळीपणाचा मुद्दा पुढे केला. वीजपुरवठा कमी-जास्त दाबाने होणे, ट्रीप होणे आदी बाबी निदर्शनास आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी असे काही होत नसल्याची नोंद आमच्याकडे असल्याचे सांगितले. येत्या 9 मे रोजी पॅनल व मोटार डिझाईन केलेले इंजिनीअर व वीज वितरणचे अभियंता संयुक्तपणे सुमारे 12 तास चाचणी घेणार आहे. दरम्यान, जलवाहिनीचे पाइप मध्येच का फुटतात त्याचा शोध घेण्यासाठी आयआयटी किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दोष दुरुस्त करावेत अशा सूचनाही आमदार कोकाटे यांनी केल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नामदेव लोंढे, माजी नगरसेवक किरण मुत्रक, संतोष शिंदे, शीतल कानडी, डॉ. व्ही. अत्रे, विजय झगडे, रामभाऊ लोणारे, हर्षद देशमुख, मालती भोळे, शेखर चोथवे, कुंदन निंबाळकर, सुनील नाईक, सुनील गवळी, अनिल वराडे, कृष्णा कासार आदी उपस्थित होते.

नगररचनाच्या कामात सुधारणा करा, अन्यथा…
नगररचना विभागाच्या कामकाजाबाबत शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह सामान्यांची ओरड असल्याचे सांगत आमदार कोकाटे यांनी कामाची पद्धत जाणून घेतली. कामाचा वेग वाढवा, अडवणूक करू नका, अन्यथा जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला. यादरम्यान माजी नगरसेवक किरण मुत्रक व मुख्याधिकारी केदार यांच्यात ‘तू तू-मै-मै’ झाली. मात्र उपस्थितांनी मुत्रक यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्यानंतर वातावरण निवळले.

हेही वाचा :

Back to top button