निपाणी: पुढारी वृत्तसेवा: आजची युवापिढी व्यसनाधीन, व्यभिचारी या मार्गाचा अवलंब करून आपले आयुष्य वाया घालवत आहे. त्यामुळे आजच्या युवावर्गाने कार्यकर्ता म्हणून जगण्यापेक्षा मावळा म्हणून जगले पाहिजे तसे झाले तरच भविष्यात त्याचे जीवन सार्थकी लागेल. स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवापिढीने जगले पाहिजे, असे विचार ह.भ.प.शिवलीला पाटील यांनी मांडले.
कुर्ली (ता. निपाणी) येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य अॅड. अमर शिंत्रे (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात त्या बोलत होत्या. युवा नेते उत्तम पाटील यांच्या पत्नी धनश्री पाटील यांच्या हस्ते शिवलीलात पाटील यांचा तर हालसिद्धनाथांचे भक्त भाकणूककार भगवान डोणे महाराज (वाघापूर) यांचा विजयकुमार शिंत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रत्येक मातेने योग्य वेळेत आपल्या मुलावर संस्कार केले पाहिजेत. युवापिढीने आपल्या मायबापाला कधी विसरू नये. ते आपल्यासाठी दैवत आहेत.जीवनाला कलंक लागेल असे जगू नका. आपल्या कुळाचा उद्धार करा व्यसनापासून दूर राहा, असे त्यांनी सांगितले.
सोहळ्यास पंचक्रोशीतील भागातील वारकरी व नागरिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. अॅड. अमर शिंत्रे यांनी आभार मानले.
गर्वाने वागू नका… हभप पाटील म्हणाल्या, अज्ञान आपल्यापासून दूर व्हावे व संतसंगती घडावी. मनुष्याने गर्वाने वागू नये, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तुम्ही दुसर्यासाठी जगा, आयुष्यात दुसर्याचे चांगले चिंता आपले चांगलेच होईल. आजच्या कलियुगात रावणाच्या प्रवृत्तीची माणसे आहेत. त्यामुळे आदर्श समाजाची घडी विस्कळीत होऊन समाज बिघडत आहे.तेव्हा चांगल्या समाजनिर्मितीसाठी रामाच्या प्रवृत्तीची माणसे जन्माला आली पाहिजेत.
हेही वाचा