पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli on Arshdeep : पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाच्या पराभवानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर बरीच टीका होत आहे. आसिफ अलीचा सोपा झेल सोडल्याने त्याच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. मात्र, दिग्गज फलंदाज विराट कोहलीने त्याचा बचाव केला असून, सामन्यांमध्ये अशा गोष्टी होतच राहतात, असे म्हटले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खराब फटकेबाजी केल्यामुळे मी कसा दडपणाखाली आलो होतो याबाबत खुद्द विराटने स्वतःचे उदाहरण दिले.
182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 17 षटकांत 148 धावसंख्येवर चार विकेट गमावल्या होत्या. 17 व्या षटकात पाकिस्तानने मोहम्मद रिझवानची विकेट गमावली होती आणि सामन्याचे पारडे भारताकडे कलले होते. दरम्यान, 18 व्या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजीसाठी आला, त्याने दबावाखाली काही चेंडू वाईड टाकले. याच षटकात तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज आसिफने जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच गेला. आता हा चेंडू फिल्डरच्या हातात जाणार आणि आसिफ बाद होणार असे वाटत असतानाच अर्शदीपच्या हातातून सोपा झेल सुटला. (Virat Kohli on Arshdeep)
हा झेल सोडल्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीप सिंगवर जोरदार निशाणा साधला जात आहे, मात्र टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याचा बचाव केला आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. हा एक मोठा सामना आहे आणि परिस्थिती खूप गंभीर होती. मला आठवते की मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा खेळलो तेव्हा मी शाहिद आफ्रिदीविरुद्ध खूप खराब फटका मारला होता. पहाटे 5 वाजेपर्यंत मी फक्त छताकडे पाहत होतो आणि मला झोप येत नव्हती. मला वाटले की आता मला पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही आणि माझी कारकीर्द संपली आहे. त्यामुळे अशा प्रकारची भावना असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अर्शदीपनेही आपली कारकीर्द संपली आहे असे वाटून घेऊ नये चुकांमधून शिकून पुढील वाटचाल करत रहावी, असा सल्लाही त्याने दिला. (Virat Kohli on Arshdeep)