पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) सुपर 4 फेरीची सुरुवात भारतीय क्रिकेट संघासाठी निराशाजनक झाली. रविवारी (4 सप्टेंबर) झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 181 धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकचा दिग्गज सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम झटपट बाद झाला. टीम इंडियाकडे सामना जिंकण्याची संधी होती. पण शेवटच्या षटकात (19.5) एक चेंडू राखून पाकिस्तानने विजयी लक्ष्य गाठले.
या आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव आहे. असे असले तरी रोहित ब्रिगेडच्या अडचणीही वाढल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग आता भारतीय संघासाठी सोपा नसून त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे. चला तर, सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाककडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी काय करावे लागणार हे जाणून घेऊया.
भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी अंतिम फेरीत पोहोचण्याचे दरवाजे अद्याप बंद झालेले नाहीत. खरं तर, सुपर 4 फेरीत पोहचलेला प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळयचे आहेत. यापैकी अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सुपर 4 फेरीत अजून दोन सामने खेळायचे आहेत. जे तुलनेने सोपे असल्याचे बोलले जात आहे. हे सामने अफगाणिस्तान आणि श्रीलंके विरुद्ध आहेत. भारताला हे दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. पण विजयासह भारतीय संघाला रनरेट सुद्धा चांगला ठेवावा लागेल. भारताने आपले दोन्ही सामने जिंकले तर ते अंतिम फेरीत पोहोचतील.
सुपर 4 फेरीत फक्त दोन सामने खेळले गेले आहेत. श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे, तर टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना त्यांचे पुढचे सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहेत. इथे दोन्ही संघांनी सामना जिंकला तर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील.
सुपर 4 मध्ये, भारतासह सर्व संघांना प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये सर्वांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. रोहित ब्रिगेडला आता श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना 6 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 8 सप्टेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
सुपर-4 फेरीतील सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जात आहेत. या फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. हा 11 सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
6 सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका (दुबई)
7 सप्टेंबर : अफगानिस्तान विरुद्ध पाकिस्तान (शारजाह)
8 सप्टेंबर : भारत विरुद्ध अफगानिस्तान (दुबई)
9 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (दुबई)