टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल! ‘या’ खेळाडूंना प्लेईंग 11 मधून बाहेर काढण्याची दाट शक्यता | पुढारी

टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल! ‘या’ खेळाडूंना प्लेईंग 11 मधून बाहेर काढण्याची दाट शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : आशिया कपमधील सुपर-4 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5 गडी राखून मात केली. हा सामना खूपच रोमांचक झाला. पण या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग 11 कॉम्बिनेशनवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने तर भारताच्या प्लेइंग 11 बद्दल खोचक टोमणा मारला आहे. संघातील अंतिम 11 खेळाडूंबाबत संभ्रम असल्याचे त्याने म्हटले आहे. याचबरोबर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही रोहितच्या स्ट्रॅटेजीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकविरुद्धच्या पराभवानंतर आता संघात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया भारताच्या पुढील सामन्यात पाहायला मिळू शकतील अशा 3 मोठ्या बदलांबाबत…

ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकचा समावेश?

ऋषभ पंत पाकिस्तानविरुद्ध 14 धावा करून बाद झाला. पंतने अत्यंत खराब शॉट खेळला आणि त्याची महत्त्वपूर्ण विकेट गमावली. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले होते. कार्तिक संघाला आपल्या स्फोटक खेळीच्या जोरावर फिनिशरची भूमिका उत्तम पार पाडतो. आयपीएलमधील अनेक सामन्यांमध्ये त्याने हे सिद्ध केले आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा तो प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

दीपक हुडाच्या जागी अक्षर पटेल?

दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयामुळे चाहते नाराज होऊ शकतात. पण रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर केवळ अक्षर पटेलच जड्डूच्या जागी योग्य आहे असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांना वाटते. अक्षर पटेल जडेजासारखा डाव्या हाताने गोलंदाजी करतो. तसेच तो फलंदाजीत महत्त्वाच्या क्षणी मोठे फटके मारून संघाची धावसंख्या वाढवू शकतो. अशा परिस्थितीत टीम कॉम्बिनेशन सुधारण्यासाठी दीपक हुड्डाऐवजी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.

युझवेंद्र चहलच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी?

आशिया चषक 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याचे गोलंदाजीतील आकडे काही विशेष दाखवत नाहीत. चहलने या स्पर्धेत संघासाठी आतापर्यंत सर्व तीन सामने खेळले आहेत ज्यात त्याने 12 षटकात 7.75 च्या इकॉनॉमीने एकूण 93 धावा दिल्या आहेत. यादरम्यान चहलने केवळ एक विकेट घेतली आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने 4 षटकात 43 धावा दिल्या. तो खूम महागडा गोलंदाज ठरला. त्यामुळे चहलऐवजी आता अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले जाऊ शकते. संघ अडचणीत असल्यास तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.

Back to top button