विराट झाला भावुक! म्हणाला, ‘मी कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त धोनीने मला..’ | पुढारी

विराट झाला भावुक! म्हणाला, 'मी कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त धोनीने मला..'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) आशिया चषक 2022 च्या मोसमात आपली जुनी लय पुन्हा मिळवली आहे. रविवारी कोहलीने स्पर्धेतील तिसरा सामना खेळला आणि सलग दुसरे अर्धशतक झळकावले. पाकिस्तान विरुद्धचा हा सामना भारतीय संघाने जरी गमावला असला तरी कोहलीची पूर्वी प्रमाणे फटकेबाजी पाहून प्रेक्षकांना आनंदच झाला.

सामना संपल्यानंतर कोहलीने आपली व्यथा मांडली. जेव्हा तो वाईट टप्प्यातून जात होता आणि जेव्हा त्याने टी-20 किंवा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हाची परिस्थिती त्याने सांगितली. कोहली म्हणाला, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा एकाच व्यक्तीचा मेसेज आला, आणि तो होता महेंद्रसिंग धोनी. अनेकांकडे माझे नंबर आहेत. टीव्हीवरही अनेकजण सल्ले देतात. पण ज्यांच्याकडे माझा नंबर आहे पण त्यांच्याकडून मला मेसेज आला ना कॉल. जेव्हा एखाद्याशी संबंध असतात आणि ते अस्सल असतात, तेव्हा त्याचे रिफ्लेक़्शन असे दिसते. दोन्ही बाजूंनी सुरक्षा असते. ना मला त्यांच्याकडून काही हवंय, ना त्यांना माझ्याकडून काही अपेक्षित आहे, अशी भावना त्याने बोलून दाखवली.

‘लोक जगा समोर सूचना देतात, वैयक्तिक नाही’

उघडपणे टीका करणाऱ्यांना कोहलीने चोख प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, ‘मला कुणाला काही सांगायचे असेल तर मी वैयक्तिकरित्या सांगेन. मदत करायची असली तरी मी ती वैयक्तिकरित्या करेन. जगा समोर तुम्ही मला सल्ले दिले तर त्याचा मला काय उपयोग? तुम्हाला माझ्या कामाबद्दल काही सांगायचे असेल किंवा सुचवायचे असेल तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या सांगू शकता. मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो, म्हणून मला या गोष्टी दिसतात. मला काही फरक पडत नाही असेही मी म्हणणार नाही. मी सर्वतोपरी प्रयत्न करतो, देणारा वरती (इश्वर) आहे. जोपर्यंत मी खेळत राहीन तोपर्यंत मी असेच खेळेन, असे त्याने सांगितले.

कोहलीची फिफ्टी, पण भारताचा पराभव…

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 गडी गमावून 181 धावा केल्या. विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावा केल्या. कोहलीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. त्याने आपल्या खेळीत एक षटकार आणि 4 चौकार मारले. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला. यामध्ये 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 5 गडी गमावून 182 धावा केल्या आणि सामना जिंकला. रिझवानने 51 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय मोहम्मद नवाजने 20 चेंडूत 42 धावा केल्या. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली.

Back to top button