पुढारी ऑनलाईन डेस्क : Ajit Agarkar On Shikhar Dhawan : आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. संजू सॅमसनचा संघात 18वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला. पण शिखर धवनला या संघात स्थान मिळालेले नाही. निवड समितीने सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, शुभमन गिल आणि ईशान किशन यांना पसंती दिली आहे. पण त्यांनी अनुभवी धवनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आहे, अशातच सोशल मीडियावरही गब्बरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आशिया कप संघ निवडीनंतर बीसीसीआयचे चिफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान आगरकर यांना शिखर धवनला वगळण्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. यावर चिफ सिलेक्टर म्हणाले की, 'धवनची भारतासाठीची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पण आमच्याकडे सलामीवीर म्हणून पर्याय आहेत. सध्या आम्ही रोहित शर्मा, शुभमन गिल आणि ईशान किशनवर विश्वास व्यक्त केला आहे.' आगरकर यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले त्यावरून आता धवनचा टीम इंडियाचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
धवनला आशिया कपच्या संघात संधी मिळालेली नाही, त्यानंतर आता त्याची वर्ल्डकप संघातही निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धवन हा जवळपास 38 वर्षांचा आहे आणि त्याने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. बांगलादेश दौऱ्यातील खराब प्रदर्शनामुळे त्याला वनडे संघातून वगळण्यात आले होते. त्याने बांगलादेशविरुद्ध 7, 8 आणि 3 धावा केल्या. अशा स्थितीत आता त्याचे टीम इंडियात पुनरागमन होणे शक्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.