पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या आज (दि. २३) भेटीसाठी अहमदाबाद येथे गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी देखील शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली होती. अदानी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची एक्स पोस्ट चर्चेत आली आहे. (Sharad Pawar And Gautam Adani)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे शरद पवार यांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी, या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाचा मान मिळाल्याचा आनंद देखील व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पवार यांनी अदानी यांची भेट घेतल्याच्या कारणावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगलेल्या आहेत.
आज (दि. २३) दुपारी उशीरा पवार यांच्या एक्स पोस्टद्वारे त्यांची भेट झाल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाले. गौतम अदानी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा बहुमान मिळाला. असे पवार यांनी एक्स पोस्टमध्ये लिहीलेले आहे.
आज दिवसभर पवार आणि अदानी यांच्या भेटीच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या होत्या. या चर्चेतील भेटीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली. शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल तर त्यात नवीन काय आहे? असा सवाल रोहीत पवार यांनी केला.
शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल तर त्यात नवीन काय आहे? पवार साहेब अंबानी, अदानी यांना भेटतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर राज्याचा आणि देशाचा विकास कसा करता येईल यावर चर्चा होत असते. त्यानंतर आपण पॉलिसी करत असतो. सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी कधीही करता येत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.