अजित पवारांकडून मुस्लिम आरक्षणावर चर्चा; भाजप नाराज

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात राज्यातील मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न आणि आरक्षणाबाबत बैठक घेतली. आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून महायुतीच्या सरकारसमोर पेच निर्माण झाला असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट आपल्या अधिकारात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी बैठक घेतल्यामुळे भाजप नाराज झाला आहे.
यापूर्वीही पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा खात्याची बैठक घेतली होती. आता गुरुवारी मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात बैठक घेऊन त्यांनी जणू शिंदे आणि फडणवीस यांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात 2014 मध्ये मराठा समाजास 16 टक्के व मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र ही दोन्ही आरक्षणे न्यायालयात टिकू शकली नाहीत. असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महायुती सरकारने आश्वासन दिले आहे. मात्र, मुस्लिम आरक्षण देण्याबाबत भाजपाने कोणतेही पाऊल उचलले नसताना अजित पवारांनी मुस्लिम आरक्षणाबाबत आढावा घेतला. अजित पवार आणि शिंदे गटात मुस्लिम समाजाचे प्रत्येकी एक मंत्री आहेत. अजित पवार गटातील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच एकनाथ शिंदे गटातील पणनमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.