Sharad Pawar: शरद पवार मुख्यमंत्री शिदेंना, तर अदानी पवारांना भेटले!; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत | पुढारी

Sharad Pawar: शरद पवार मुख्यमंत्री शिदेंना, तर अदानी पवारांना भेटले!; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: गुरुवारी (दि.०२) मुंबईत झालेल्या दोन पॉवरफुल्ल भेटींनी चर्चांना उधाण आले. देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्यात सध्या आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तर पवार वर्षावरून घरी परत ‘, येताच श्रीमंत उद्योगपती आणि भाजपचे निकटवर्तीय गौतम अदानी सिल्वर ओकवर दाखल झाले. या दोन्ही भेटींमध्ये (Sharad Pawar) काय बोलणे झाले हे गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दहा महिने मुख्यमंत्री असले तरी गुरुवारी पवार वर्षावर प्रथमच गेले. त्यातही पवारांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदेशात असताना झालेली त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट पाऊण तास चालली. वर्षातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता पवार निघून गेल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र, पवार यांची ही सदिच्छा भेट होती. त्यांनी आपल्याला मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षाहून थेट सिल्वर ओक या आपल्या निवासस्थानी पोहोचलेल्या पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. आधी मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यापाठोपाठ अदानी यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ पत्रकार काढू लागल्यामुळे स्वतः पवार यांनीही ट्विट करत आपण मराठा मंदिर या संस्थेचा अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली, असेही पवार यांनी ट्विट केले.

Sharad Pawar: अदानींसोबत अर्धा तास गुफ्तगू

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार घरी सिल्वर ओकला परत येताच उद्योगपती गौतम अदानी तेथे पोहोचले. या दोघांमध्ये अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. या दोन्ही गाठीभेटी पाठोपाठ झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नाही. भेटीनंतर अदानी आपल्या गाडीतून रवाना झाले. पवार आणि अदानी यांचे मधुर संबंध सर्वांना माहिती आहेत.

पवार यांच्या आत्मचरित्रातही अदानी यांचे कौतुक केले आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात सर्व विरोधी पक्ष जेपीसीच्या मागणीसाठी अडून बसलेले असताना शरद पवार यांनी मवाळ भूमिका घेतली. त्यानंतर २० एप्रिल रोजी अदानी यांनी सिल्व्हर ओक येथेच पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अदानी पवार यांची ही लागोपाठ दुसरी भेट होय.

हेही वाचा:

Back to top button