पुणे : पुढारी वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 119 वा पदवी प्रदान सोहळा सोमवारी दि.13 डिसेंबरला सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या पदवी प्रदान सोहळ्यात 4 हजार 237 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. परंतु पदवी प्रदान सोहळ्याला केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही हा सोहळा नेमका कधी होणार याची माहिती विद्यार्थ्यांसहित माध्यमांनादेखील नसल्याचे उघडकीस आले आहे. पुणे विद्यापीठ कडून वर्षातील दुसरा पदवी प्रदान सोहळा सोमवारी होत आहे.
पदवी प्रदान सोहळ्यात ऑस्ट्रेलियन कॉन्स्टलेट जनरलचे कॉन्सल जनरल पिटर ट्रुसवेल स्नातकांना उद्देशून भाषण करणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत, तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ऑनलाईन उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
पुणे विद्यापीठाच्या नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील 900 हून अधिक संलग्न महाविद्यालयात विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण किंवा नोकरीसाठी गुणपत्रिकेबरोबरच पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थी देखील अर्ज करत असतात. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा पदवी प्रदान सोहळा घेऊन पदवी वितरित केली जाते. सोमवारी होणाऱ्या पदवी प्रदान सोहळ्याची विद्यार्थ्यांना माहितीच नसल्याने कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दोन दिवसांवर आलेल्या पदवी प्रदान सोहळ्याची विद्यार्थ्यांना माहितीच नाही.
पदवी प्रदान सोहळ्याला दोन दिवस बाकी असतानाही पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून माध्यमांना याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील हा पदवी प्रदान सोहळा कधी होणार आहे याची माहिती नसल्याचे पदवीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
पदवी दिले जाणारे विद्यार्थी
डिप्लोमा – ४५
पदवीधर – ३१७३
एमफिल – १२
पीजी डिप्लोमा – १५
पीएचडी – ६१
पदव्युत्तर पदवी – ९३१
एकूण – ४ हजार २३७