पुणे : आळेफाटा-कल्याण प्रवास भाडे पाचशे रुपये, एसटी संपाचा प्रवाशांना फटका

आळेफाटा बस्थानकात खासगी वाहन उभे करून प्रवाशी भरले जात आहे
आळेफाटा बस्थानकात खासगी वाहन उभे करून प्रवाशी भरले जात आहे
Published on
Updated on

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप प्रवाशांचे हाल करणारा तर खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडला आहे. एसटी बस बंद असल्याने नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातून प्रवाशांची लूट होत असून आळेफाटा येथून कल्याणला जाण्यासाठी अनेकांना पाचशे रुपये भाडे मोजावे लागल्याचे सांगण्यात आले आहे. इतर ठिकाणी जाण्यासाठीही जादा भाडे द्यावे लागत आहे.

दिवाळीच्या आधी तुरळक गाड्या सुरू होत्या. त्यामुळे नागरिक सुट्टीसाठी गावी आले. मात्र, दिवाळी संपताच शनिवारी रात्रीपासून संपाची तीव्रता वाढविण्यात आली. सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे जवळपास सर्वत्र एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.  वाहक-चालक आगार परिसरात धरणे-ठिय्या देत आहेत. तर सुट्टीहून परतण्यासाठी प्रवाशी बसस्थानकात ताटकळत उभे आहेत.

बंद नसलेल्या एखाद्या आगाराची गाडी आली की त्यामध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ उडत आहे. जागा मिळाली नाही, तर दुसरी गाडी येणार की नाही, याची शाश्वती नाही. बसस्थानकात यासंबंधी कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवासी असाह्य झाले आहेत. याचा गैरफायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी उठविल्याचे दिसून येते.

कोरोना काळात झालेला तोटा भरून काढण्याची नामी संधी म्हणूनच याकडे अनेक खासगी वाहतूकदार पाहत आहेत. विशेष म्हणजे आळेफाटा बस्थानकात बस किंवा खासगी वाहन उभे करून प्रवाशी भरले जात आहेत. नोकरीच्या  ठिकाणी परतण्याची प्रवाशांची अगतिकता आणि नाईलाज लक्षात घेता त्यांनी अचानक अघोषित भाडेवाढ केली आहे. प्रवाशांची परिस्थिती पाहून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे.

आळेफाटा चौकातून कल्याण आणि पुणे येथे परतणाऱ्यांची संख्या मोठी

रविवारी दुपारपासून आळेफाटा चौकातून कल्याण व पुणे येथे परतणाऱ्यांची संख्या मोठी होती. या संधीचा गैरफायदा उठवत खासगी वाहतूकदारांनी कल्याणसाठी अनेक प्रवाशांकडून पाचशे रुपये भाडे उकळण्याच्या तक्रारी आहेत. तर नाशिक फाटा जाण्यासाठी तीनशे रुपये रात्रीची वेळ, दुसऱ्या दिवशी कामावर पोहोचण्याची आवश्यक्ता आणि एसटीची खात्री नाही, अशा कात्रीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी नाइलाजाने हे वाढीव भाडे देऊन प्रवास केल्याचे सांगण्यात आले.

सोमवार सकाळपासून बहुतांश आगारातून गाड्या सुटल्याच नाहीत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आगारातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी आहेत. कल्याण व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अद्यापही गर्दी आहे. स्थानकात बस येत नसल्याने रस्त्यावर उभे राहून मिळेल त्या खासगी वाहनाने कामाच्या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे. खासगी वाहतुकीचे प्रवास भाडेही परिवहन विभागातर्फे निश्चित करून दिले जात असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. प्रवाशीही अधिकृतपणे तक्रार करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news