याकुटिया मध्ये तापमान तब्बल उणे ५५ अंश सेल्सियसपर्यंत कमी | पुढारी

याकुटिया मध्ये तापमान तब्बल उणे ५५ अंश सेल्सियसपर्यंत कमी

मॉस्को : नोव्हेंबरला सुरुवात होताच गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. यामुळे भारतामध्ये लोक गरम पाण्याने स्नान आणि स्वेटर्स वापरू लागले आहेत. तसे पाहिल्यास भारतातही काही ठिकाणी पारा एक अंशापासून शून्याच्या खाली घसरतो. मात्र, जगात असे एक अत्यंत थंड ठिकाण आहे की, तेथील तापमान उणे 55 अंशापर्यंत खाली जाते.

तसे पाहिल्यास आपल्या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहे की, तेथील तापमान उणे असते. यापैकी एक ठिकाण रशियातील ‘याकुटिया’ हे आहे. येथे इतकी थंडी पडते की, तेथील तापमान उणे 40 अंशापर्यंत घसरते. काही वेळा तर हेच तापमान तब्बल उणे 55 अंश सेल्सियसपर्यंत कमी होते. यापुढे आपल्या घरातील फ्रीजमधील फ्रीझरही काहीच वाटणार नाही. याकुटियाला जगातील सर्वात थंड शहर म्हणून ओळखले जाते.

रशियातील याकुटिया च्या लोकांना अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची सवय झाली आहे. थंडीत ज्यावेळी हे लोक बाहेर पडतात, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या भुवयांवरही बर्फ जमा होतो. सर्वसामान्यपणे येथील तापमान उणे 40 अंशापर्यंत कमी होते. इतक्या कमी तापमानातही तेथील लोक आपली दैनंदिन कामे करतच असतात.

मात्र, ज्यावेळी तापमान उणे 55 पर्यंत कमी होते, त्यावेळी तेथील शाळा बंद केल्या जातात. परिसरातील नद्या गोठतात. अशा नद्यांवरून वजनी ट्रकही चालवले जाऊ शकतात. अशा हवामानावरच लोकांचे जीवनमान अवलंबून असते.

Back to top button