

उत्तर प्रदेश राज्यातील फारुखाबादमधील जिल्हा कारागृहात ( Farrukhabad jail ) आज एका कैद्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या कैद्यांनी कारागृहात तुफान दगडफेक करत जाळपाेळ केली. कारागृह कर्मचार्यांसह पोलिसांवरही हल्ला केला. या हल्ल्यात कारागृह अधिकार्यासह ३० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
फारुखाबाद जिल्हा कारागृहात एका खुनाच्या प्रकरणातील आरोपी संदीप याला डेंग्यू झाला होता. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अन्य कैद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आजारी असतानाही संदीप याला जेवण दिले गेले नाही. दिवाळीतही त्याला उपाशी ठेवण्यात आले. यामुळेचा त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप काही कैद्यांनी केला.
कारागृह प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. यावेळी कैद्यांनी कारागृह अधिकारी शैलेश कुमार सोनकर यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. . पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कैद्यांनी पाेलिसांवरही हल्ला केला.
कैद्यांनी दगडफेक करत जाळपोळ सुरु केल्याने कारागृहातील परिस्थिती चिघळली. परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, अशी घटनास्थळी चर्चा होती. दरम्यान, फारुखाबाद कारागृहात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले असल्याची माहिती कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक प्रमोद शुक्ला यांनी दिली.