

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकेकाळची प्रसिद्ध दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री रंभा हिच्या कारचा कॅनडामध्ये अपघात झाला आहे. तिची मुलगी साशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Actress Rambha) बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत रंभाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभासोबत कारमध्ये लहान मुले आणि आयाही उपस्थित होती, असे समजते. या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाली नसली तरी अभिनेत्री रंभाची मुलगी साशा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actress Rambha)
रंभाने तिच्या सर्व चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी तिची मुलगी साशा हिच्यासाठी प्रार्थना करावी. 'जुडवा', 'घरवाली बहरवाली', 'क्यूंकी में झुठ नहीं बोलता' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री रंभा सध्या तिच्या मुलीबद्दल खूप चिंतेत आहे आणि तिच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.
रंभाने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री रंभाने स्वत: सोशल मीडियावर कार अपघाताची माहिती दिली आहे. तिने कारचे आणि रुग्णालयातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये रंभाची मुलगी साशा दिसत आहे जी कॅनडाच्या रुग्णालयात दाखल आहे आणि डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. दुसरा आणि तिसरा फोटो अपघातानंतर खराब झालेल्या कारचा आहे.
या पोस्टवर अनेक सेलेब्सपासून ते रंभाचे चाहते तिच्या मुलीसाठी प्रार्थना करत आहेत. ही पोस्ट शेअर करत रंभाने कॅप्शनमध्ये लिहिले – मुलांना शाळेतून घेतल्यानंतर चौकात आमच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिली. मी आणि आया पण मुलांसोबत गाडीत होतो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. किरकोळ जखमा झाल्या आहेत पण माझी छोटी साशा अजूनही रुग्णालयात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.'
रंभाने दाक्षिणात्य चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली होती. अभिनेत्री रंभाचे खरे नाव विजयालक्ष्मी आहे. तिने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभाला खरी ओळख मिळाली ती जुडवा या चित्रपटातून. तिने सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात काम केले होते. आपल्या मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर रंभाने लहान वयातच तिने वेगळे स्थान मिळवले.
रंभाने बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. रंभाने सलमान खान, गोविंदा, रजनीकांत, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्यासोबत काम केले आहे. मात्र ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट 'फिल्मस्टार'मध्ये रंभा शेवटची दिसली होती.
रंभाने ८ एप्रिल, २०१० रोजी कॅनडास्थित श्रीलंकेतील तमिळ व्यापारी इंद्रकुमार पद्मनाथन यांच्याशी लग्न केले. त्यानंतर ते टोरंटोमध्ये स्थायिक झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. लग्नानंतर रंभाने चित्रपट जगताचा निरोप घेतला होता. कारण आता तिची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे असे तिला वाटत होते. तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळणे कमी झाले. दीर्घ गॅपनंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये जज म्हणून दिसली.