Chhagan Bhujbal : तूर्तास टोलबंद आंदोलन नाही-भुजबळांचे स्पष्टीकरण | पुढारी

Chhagan Bhujbal : तूर्तास टोलबंद आंदोलन नाही-भुजबळांचे स्पष्टीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-मुंबई महामार्ग आठ दिवसांत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिल्याने 6 नोव्हेंबरपर्यंत तूर्तास टोलबंद आंदोलन करण्यात येणार नाही, अशी घोषणा माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि.31) केली. तसेच 6 नोव्हेंबरनंतर महामार्गाची पाहणी करून त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले..

गेल्या आठवड्यात नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची आ. भुजबळ यांनी पाहणी केली होती. यावेळी 31 तारखेपर्यंत खड्डे न बुजविल्यास 1 नोव्हेंबरपासून टोलबंद आंदोलनाचा इशारा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांनी आ. भुजबळांची भेट घेत आठ दिवसांमध्ये खड्डे बुजविण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे भुजबळांनी अधिकार्‍यांना संधी देऊ असे सांगत मंगळवारपासून (दि.1) पुकारलेले टोलबंद आंदोलन तूर्तास करणार नसल्याचे स्पष्ट केले. भिवंडी बायपास येथे वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीस एमएसआरडीसी जबाबदार असल्याचा आरोप करताना याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी लक्ष घालावे, असे आ. भुजबळ म्हणाले.

दरम्यान, विमानसेवा बंद, उद्योग राज्यबाहेर गेल्याबाबत आ. भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय नेतृत्व करून हे प्रश्न केंद्रात न्यायला हवे, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे, पिक इन्फ—ा कंपनीचे संचालक आनंद सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, गोरख बोडके, उद्योजक मनीष रावत, अंबादास खैरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टोलनाक्यावरील अनुचित प्रकार रोखा
टोलनाक्यांवर वसुली करत असताना टोलवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून नागरिकांना अरेरावी करण्यात येत आहे. यातून अनेक वाद होत आहे. वारंवार होत असलेल्या या अनुचित प्रकारांना तातडीने आळा घालताना संबंधित कर्मचार्‍यांना सूचना द्याव्यात, असे भुजबळ यांनी अधिकार्‍यांना सांगितले. यापुढे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही आणि आवश्यक कार्यवाही करू, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले.

वाहने तातडीने सोडवावित
टोलनाक्यावर टोलवसुली करताना वाहनांच्या रांगा लागत असून, नागरिकांना खूप वेळ ताटकळत राहावे लागते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी अधिकार्‍यांनी यावर तातडीने कार्यवाही करत टोलचालकांना सूचना कराव्यात. तसेच पाच मिनिटांहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा लागल्यास तत्काळ वाहने सोडण्यात यावी, असे भुजबळ यांनी सांगितले. यावर टोलचालकांना याबाबत पत्रक काढून सूचना देण्यात येतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी
मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिक ते इगतपुरीदरम्यान खड्ड्यांमुळे आतापर्यंत 10 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्राधिकरणाच्या वतीने मदत देण्यात यावी, अशी सूचना आ. भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली. या नागरिकांची माहिती घेऊन शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button