पिंपरी : दिवाळीमध्ये मालवाहतूक चालकांचीही सेवा | पुढारी

पिंपरी : दिवाळीमध्ये मालवाहतूक चालकांचीही सेवा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय होवू नये, या उद्देशाने माल वाहतूक थांबवून, त्या गाड्यांवरील चालकांची प्रवासी वाहतूकसाठी सेवा घेण्यात आली; तसेच आगारात एरवी आरक्षणासाठी असलेल्या दोन खिडक्यांऐवजी चार खिडक्या उपलब्ध करून देण्यात आल्या. वाहकांच्या कमतरतेमुळे विना वाहक गाड्या सोडण्यात आल्या.

दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातील आगार प्रमुख आणि कर्मचार्‍यांनी शर्तीचे प्रयत्न करून प्रवाशांना उत्तम सेवा दिली आहे. एसटी उत्पन्नवाढीमध्ये प्रवासी वाहतूकी सोबतच मालवाहतूक सेवा हा महत्वाचा घटक मानला जातो.

दिवाळीमध्ये आगारातील या सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असतानाही मालवाहतूक थांबवून आगारामधून प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटीची मालवाहतूक सेवा कमी प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोरोना संकट टळल्याने यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे कामासाठी तसेच शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेले नागरिक, विद्यार्थी हे मोठ्या संख्येने दिवाळी साजरी करण्यासाठी गावी गेले होते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता एसटीने देखील अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन केले होते.

त्यात एसटीला दिवाळीत मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीसाठी देखील प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. मात्र, बसचालकांची संख्या पाहता अतिरिक्त बसवर चालक उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ऐन दिवाळीत मालवाहतूक सेवा मोजकीच सुरू ठेवण्यात आली होती.

सणाच्या काळात गैरसोय टाळली दिवाळीमध्ये घर सामान अथवा कंपनी साहित्याची वाहतूक सुविधा खोळंबू न देता चार गाड्यांऐवजी एकच गाडी सोडण्यात आली. गावाकडे जाणार्‍या प्रवाशांची खासगी वाहतूकदारांकडून दिवाळीच्या काळात आर्थिक लूट होऊ नये, म्हणून साधला गेला समतोल.

माल वाहतूकीमधून गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यातील उत्पन्न काही प्रमाणात कमी असले तरी प्रवाशांच्या सुविधेसाठी चालकांना रवाना करण्यात आले होते. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळून त्यांचा सुखकर प्रवास होईल याकडे लक्ष दिले आहे.
                                                                       – स्वाती बांद्रे,
                                                 वल्लभनगर आगार व्यवस्थापक, पिं. चि.

मालवाहतूक कमी करून, प्रवाशी वाहतूकीवर भर
प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांवर चालकांची रवानगी
तिकीट आरक्षणावेळी गैरसोय होवू नये म्हणून दोन खिडक्यांऐवजी आणि चार खिडक्यांद्वारे सेवा.
वाहकांच्या कमतरतेमुळे विना वाहक गाड्यांचीही दिली सुविधा

Back to top button