

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर शनिवारी सकाळी गव्यांच्या एका कळपाने धुमाकूळ घातला. सुमारे 12 ते 14 गव्यांनी पठारावर मुक्तपणे फेरफटका मारला. त्यामुळे स्थानिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
कास पठारावर बिबट्यासह हिंस्त्र जंगली प्राण्यांचा सातत्याने वावर आढळून आला आहे. अनेकदा स्थानिकांना त्याचा फटका बसला आहे. शनिवारी सकाळी महाकाय गव्यांच्या कळपाने रस्त्यावरून पठारावर बिनधास्त रपेट मारली. बहुतांशी वाहनचालक दूरवर आपले वाहन उभे करून स्वत:ला सुरक्षित करून घेतले. काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच रानगव्यांची छबी आपल्या कॅमेर्यात टिपली.
सातार्याच्या पश्चिमेला 25 कि.मी. अंतरावर कास पठार हे जागतिक वारसास्थळ आहे. नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेला दिसतो. बैल कुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील जंगलात रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन घडते. शनिवारी अनेक पर्यटक तसेच स्थानिकांना रानगव्यांचा कळप दिसला. कास पर्यटनस्थळी रानगव्यांचे कळप वारंवार दिसतात. शनिवारी असाच गव्यांचा कळप दिसल्याने बघणार्यांचा थरकाप उडाला. काही काळ पठार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कास पठारावर रानगव्यांच्या कळपाने बिनधास्तपणे फेरफटका मारल्याने स्थानिकांचा थरकाप उडाला.
हेही वाचलंत का?