
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : 'मोका' कायद्यांतर्गत कारवाई झालेला मटका बुकी सम—ाट सुभाष कोराणे याच्या 29 कोटी रुपयांच्या आणि इचलकरंजी येथील तत्कालीन नगरसेवक संजय व सुनील तेलनाडे बंधूंच्या 17 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. या मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारास न्यायालयाने मनाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. (sanjay telnade and korane)
सम—ाट कोराणे याच्यासह तेलनाडे बंधूंविरुद्ध अडीच वर्षांपूर्वी 'मोका'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांविरोधात विशेष 'मोका' न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करूनही संशयित फरारी आहेत.
न्यायालयानेही या तिघांना फरार घोषित केले आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तांच्या मूल्यांकनाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता, असेही बलकवडे यांनी सांगितले.
यानुसार सम्राट कोराणे याची 29 कोटी रुपयांची, तर तेलनाडे बंधूंची 17 कोटी रुपयांची मालमत्ता निष्पन्न झाली आहे. विशेष 'मोका' न्यायालयात या मालमत्तांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यावर या मालमत्तांची खरेदी अथवा विक्री करण्यास न्यायालयाने मनाई केल्याचे ते म्हणाले.
संजय तेलनाडे याला आठवड्यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी अटक करून त्याच्या फ्लॅटची झडती घेतली आहे. योग्य दिशेने तपास सुरू आहे. न्यायालयानेही त्यावर समाधान व्यक्त केले आहे. फरारी काळातील त्याचे वास्तव्य आणि आर्थिक रसद पुरविणार्या व्यक्तींबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
त्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. सम—ाट कोराणे याचाही शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यालाही जेरबंद करण्यात पथकांना यश येईल, असेही बलकवडे यांनी सांगितले.