अपघातात मोटारसायकलवरील माय-लेकीचा जागीच मृत्यू | पुढारी

अपघातात मोटारसायकलवरील माय-लेकीचा जागीच मृत्यू

खंडाळी : अकलूज-वेळापूर रस्त्यावर माळेवाडी येथे मालवाहतूक कंटेनरने मोटारसायकलला पाठीमागून ठोकरले. या अपघातात मोटारसायकलवरील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. छाया पांडुरंग दांडगे (वय 45) व सृष्टी पांडुरंग दांडगे (18, रा. वेळापूर, ता. माळशिरस) अशी मृतांची , ओंकार पांडुरंग दांडगे (वय 20)असे जखमीचे नाव आहे.

याप्रकरणी अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, कंटेनरचालककंटेनर शिवशंकर हादीबसप्पा (वय 43) रा.नामकल, तामीळनाडू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अकलूज पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहिती अशी की, ओंकार दांडगे हा एका बँकेत शिपाई म्हणून काम करत आहे. तर सृष्टी दांडगे (वय 18) ही शिक्षण घेत होती. आई छाया दांडगे या नातेवाईकांच्या हॉटेलमध्ये काम करीत होत्या.

छाया या बुधवारपासून आजारी होत्या. त्यामुळे ओंकार हा मोटारसायकलने (एम.एच.01 01 ए. एस. 2370) त्यांना घेऊन वेळापूरहून अकलूजकडे दवाखान्यात उपचारासाठी निघाला होता. त्याने बहीण सृष्टीलाही सोबत घेतले होते. ते तिघेजण एकाच दुचाकीवरून निघाले होते.

दुपारी 12.15 च्या दरम्यान ते माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ पोहोचले होते. याच दरम्यान हादीबसप्पा हा मालवाहतूक कंटेनरने (क्र. के. ए. 01 ए. एच. 5951) निघाला होता. कंटेनरने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर कंटेनरने मोटारसायकलला फरफटत नेल्याने जखमी होऊन छाया दांडगे व सृष्टी दांडगे या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकलूज येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

याबाबत छाया दांडगे यांचे जावई विनोद कुमार पवार (वय 35, रा. वेळापूर) यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास सपोनि वैभव मारकड हे करीत आहेत.

Back to top button