सोलापूर : शासकीय जमीन हडप करणार्‍या माजी महापौरासह दोघांवर गुन्हा | पुढारी

सोलापूर : शासकीय जमीन हडप करणार्‍या माजी महापौरासह दोघांवर गुन्हा

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या ताब्यात असलेली कोट्यवधींची जमीन महापौरपदाचा गैरवापर करून हडप केल्याप्रकरणी माजी महापौरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

माजी महापौर मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती, लकी चौक) व लता सुदाम जाधव (रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी योगेश नागनाथ पवार (वय 27, रा. अभिषेक पार्क, धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, 20 मार्च 1993 ते 20 मार्च 1994 या कालावधीत मनाहेर सपाटे हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर होते. सपाटे हे सन 1991 पासून ते आजतागायत यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

या संस्थेला अभिषेकनगर, मुरारजी पेठ येथील टीपी-4, फायनल प्लॉट नं. 106, क्षेत्र 7863 चौ.मी. ही जागा स्वत: अध्यक्ष असलेल्या संस्थेला देण्यासाठी शासनाच्या आदर्श नियमांचा भंग केला.

20 जुलै 1993 रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. 172 अन्वये बेकायदेशीरपणे शैक्षणिक वापर करण्यासाठी संस्थेस जागा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. त्यावेळी ती मिळकत जमीन ही महानगरपालिकेच्या नावे किंवा प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीस नव्हती.

त्यावेळी त्या मिळकतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा चालू होता. याबाबत मनोहर सपाटे यांना पूर्ण माहिती असूनसुद्धा सपाटे यांनी महापौरपदाचा गैरवापर स्वत:च्या हितासाठी केला.

प्रशासनावर दबाव टाकून श्री यशवंत शिक्षण प्रसारक या संस्थेच्या शाळेला शैक्षणिक मान्यता मिळाली नसतानाही संस्थेला फायदा होण्यासाठी ठराव मंजूर करून घेतला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर शाळा मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडील शिक्षण व सेवायोजना विभागाकडे 19 एप्रिल 1994 रोजी लेखी अर्ज केला.

त्यानंतर 10 जानेवारी 1995 रोजी या संस्थेस शाळेची मंजुरी मिळाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही मिळकत 24 जानेवारी 1995 रोजी महानगरपालिकेच्या ताब्यात दिली. त्यावेळी त्या मिळकतीची किंमत ही 15 कोटी रूपये होती.

संस्थेची आर्थिक परिस्थिती नसल्याने मनोहर सपाटे यांनी महापौरपदाचा गैरवापर करून या जमिनीचे शासकीय किंमतीनुसार जमिनीचे पैसे भरण्याचे मान्य केले. मात्र 3 लाख 75 हजार इतकी रक्कम न भरता खोटा पावती क्रमांक 74605 दाखविला आणि 26 जुलै 1995 रोजी खरेदीदस्त अन्वये खरेदी केली.

ही जागा खरेदी करताना संस्थेचे सदस्य नसताना खरेदीखतावर संस्थेचे सचिव म्हणून लता जाधव यांनी सही करून मनोहर सपाटे यांच्या गैरकारभारात मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याचा पुढील तपास अँटिकरप्शन ब्युरोच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे या करत आहेत.

Back to top button