शिक्रापूर ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक तरी उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन, असे जाहीर आव्हान शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील यांना दिले.
शिरूर-हवेली तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिक्रापूर येथे मेळावा झाला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हे एक विद्वान नेते आहेत. तरीही त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा केली. परंतु, शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक तरी उदाहरण दाखवा, असे आव्हान राऊत यांनी दिले. शिवसेना ही पाठीत खंजीर खुपसणारी नसून समोरून वार करणारी आहे, असा पुन्हा एकदा उल्लेख केला.
सत्ता हा काही शिवसेनेचा प्राणवायू नाही. भाजपचे 106 आमदार निवडून येऊनही सत्ता न मिळाल्याने ते तडफडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांनी विरोधी पक्षांसारखे वागू नये, असा सल्ला खा. राऊत यांनी आपल्या मित्रपक्षांना दिला. काही स्थानिक नेते सरंजामशाही राजकारण करीत आहेत.