पुणे : पुढारी वृत्तसेवा
फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीवर बलात्कार करून खंडणी उकळल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली. सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22) आणि आशिष विजय कांबळे (वय 23, दोघे रा. थिटे वस्ती, खराडी) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणी खराडी येथील एका 23 वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार खराडी परिसरातील डब्ल्यूटीसी सेंटर, वाघोलीतील खांदवे नगरमधील कृष्णा लॉज येथे जून 2021 ते 20 मे 2022 दरम्यान घडला. आरोपी सिद्धार्थ हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने फिर्यादीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फिर्यादी यांना मेसेज करून, तसेच मोबाईलवर फोन करून फिर्यादी यांना 'तू मला खूप आवडतेस', असे म्हणून तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान यावेळी फिर्यादीचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले. ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करेन व तुझ्या घरच्यांना दाखवेन, अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी 17 हजार रुपये उकळले. तसेच त्याचा मित्र आशिष कांबळे यानेही फिर्यादी यांना धमकी देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच तिला मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यामुळे सतत होणारा अत्याचार आणि पैशांची मागणी याला कंटाळून शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.