

पळशी; पुढारी वृत्तसेवा : सातारा रोड येथील वसंत सहकारी औद्योगिक वसाहतीतील गणेश फरसाणा कंपनीला मंगळवारी पहाटे आग लागली. बघता – बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात गोंधळ उडाला.
सातारा, रहिमतपूर यासह अनेक नगरपालिकांचे अग्निशामक दलाचे बंब, कूपर कंपनीची अग्निशमन यंत्रणा, ग्रामस्थ आणि पोलिसांनी अविरत परिश्रम घेतल्यानंतर तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आली.
अधिक वाचा :
आगीमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सातारा रोड येथील चौकी परिसरात यशवंत औद्योगिक सहकारी संस्था असून, तालुक्यातील मिनी एमआयडीसी म्हणून ती परिचित आहे.
जुन्या काळातील ही औद्योगिक वसाहत असून, कूपर कारखान्यासाठी लागणार्या छोटे – मोठे स्पेअर्स बनविणारे अनेक उद्योग येथे होते.
कालांतराने कूपर कारखान्याचे उत्पादन कमी आल्यानंतर या औद्योगिक वसाहतीची रया गेली. सद्यस्थितीत स्थानिक लोकांचे छोटे- मोठे कारखाने तेथे आहेत.
सातारारोडमधील नंदकुमार नामदेव कुलकर्णी आणि विनायक परशुराम गजरे यांनी एकत्रित येऊन १४ हजार चौरस फूट क्षेत्रावर श्री गणेश फरसाणा कंपनीची स्थापना केली. ही कंपनी ७ हजार चौरस फूट इमारतीत कंपनी सुरु होती.
वैभव नंदकुमार कुलकर्णी व संकेत विनायक गजरे यांनी शाही नमकीन कंपनी सुरु केली. या दोन्ही कंपन्या एकाच ठिकाणी सुरु होत्या.
अधिक वाचा :
मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास या कंपनीला आग लागली. फरसाणा निर्मितीसाठीचे तेल, खाद्यपदार्थ आदी ज्वलनशील साहित्य व मशिनरी असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटाच्या आवाजाने कामगाराला जाग आली.
कंपनीला आग लागलेली पाहून त्याने लगेच कंपनीचे मालक कुलकर्णी यांना फोन लावला. आगीचे मोठे लोट आणि धुरामुळे सातारारोडमध्ये एकच खळबळ उडाली. ज्याला माहिती समजेल, त्याने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांनी अग्निशामक दलाचे बंब येईपर्यंत मिळेल त्या वस्तुने पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
सातारारोड दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार मिलिंद कुंभार, कर्मचारी सोनमळे यांच्यासह पोलीस दल, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
मंडल अधिकारी जाधव, तलाठी प्रशांत पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.
हेही वाचले का?
पाहा : साळावली धरणाचे नयनरम्य फोटोज्
[visual_portfolio id="6394"]