वारणा धरण
वारणा धरण

वारणा धरणात ११ दिवसांत ११.५३ टीएमसी पाणीसाठा; ८९४ मिलिमीटर पावसाची नोंद

Published on

सरुड (कोल्हापूर) : चंद्रकांत मुदूगडे : शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या सलग ११ दिवसांत पावसाने उघडीप दिलेली नाही. याकाळात वारणा (चांदोली) धरणातील पाणीसाठ्यात ११.५३ टीएमसीने वाढ झाली. तर पाणीपातळी १६ मीटरने वाढली आहे. वारणा धरण ३४.४० टीएमसी क्षमतेचे आहे. शुक्रवारी दुपारी हे धरण ६६.८२ टक्के (२३ टीएमसी) भरले पावसाची संततधार अशीच कायम राहिल्यास संभाव्य पूरनियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून केव्हाही पाणीविसर्ग सुरू करण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत. वारणा धरणाच्या वीज गृहातून शुक्रवारी सायंकाळी २ हजार क्युसेक पाणीविसर्ग सुरू केल्याची माहितीही प्रकल्पाचे सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी दिली.

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू वर्षी एकूण १०८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये १ जून नंतरच्या ३५ दिवसात अवघा १८८ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र त्यापुढील ११ दिवसांत ८९४ मिलिमीटर (सरासरी ८१.२७ मि मी) पावसाची नोंद झाली. यामध्ये १० जुलैच्या सकाळी (२४ तासात) १२० मिलिमीटर इतका यंदाचा उच्चांकी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावरूनच धरणक्षेत्रात झालेल्या संततधार पावसाचा नेमका अंदाज येतो.  अतिवृष्टीमुळे वारणा धरणातील वाढलेली पाण्याची आवक पाहता बुधवारी (ता.१३) २० हजार २०२ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची झाली. आजघडीला धरणात १६ हजार २५१ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
संभाव्य पूर पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाला सुरुवातीपासूनच सातर्कता बाळगावी लागत आहे.

सद्या वारणा (चांदोली) धरणातील पाणीपातळी ६१४ मीटरवर पोहचली आहे. हवामान खात्याने शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार धरणक्षेत्रात पावसाचा सरासरी वेग कायम होता. मात्र शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत यलो अलर्ट तर पुढे ग्रीन अलर्ट जारी केल्यामुळे नजीकच्या काळात पावसाचा जोर मंदावण्याची शक्यता आहे. ही उपलब्ध संधी म्हणून लगतच्या चार दिवसात वारणा धरणातील सद्याची पाणीपातळी काहीअंशी कमी करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असेही सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी सांगितले.

कडवी धरणक्षेत्रातही मुसळधार

दरम्यान कडवी (निनाईपरळे) धरणक्षेत्रात यंदा १ हजार ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये १० जुलैच्या सकाळी (आधीच्या २४ तासात) १८२ मिलिमीटर इतक्या यंदाच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. अडीच टीएमसी क्षमता असणारे कडवी धरण ७० टक्के (१.८० टीएमसी) भरले आहे. कडवी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात गेल्या ११ दिवसात १ टीएमसीने वाढ झाली आहे. तर पाणीपातळी ८ मीटरने वाढली आहे. वीजनिर्मिती केंद्र अद्यापही बंद आहे.

हे ही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news