भंडारा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नृसिंह मंदिरात अडकले १५ भाविक

भंडारा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नृसिंह मंदिरात अडकले १५ भाविक
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला संततधार पाऊसामूळे वैनगंगा, चुलबंद, बावनथडी या नद्यांच्या पातळीत झालेली वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. मोहाडी तालुक्यातील मोहगाव/देवी येथे वीज पडून एका तरूण शेतक-याचा मृत्यू तर अन्य १५ जण जखमी झाले आहेत.

गेल्‍या दोन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने तुमसर तालुक्याला झोडपून काढले आहे. या तालुक्यातील सिहोरा परिसरातून जाणारा भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. तर अनेक गावांत १०० हुन अधिक घरांची पडझड झाली आहे.

सिहोराजवळील गोंदेखारी गावात नाल्याचे पाणी गावात शिरल्याने शामराव बागडे, श्रीराम शहारे, ज्ञानेश्वर शेंदरे, गोवर्धन शेंडे, धनराज शहारे, वसंत चौधरी, टोळीराम शेंडे यांचे घरे बाधित झाले आहे. गावातील नाल्यावरील पूल चार फुटाने पाण्याखाली आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बिनाखी गावात पांदण रस्ता वाहून गेला आहे. गावातील प्रीतीलाल पटले, रितेश पटले, शिशुपाल पटले यांचे घरात चार फूट पाणी शिरल्याने कुटुंबियांचे शासकीय सभामंडपात स्थानांतरण करण्यात आले आहे. याच गावातील कैलाश तुरकर, दिनेश तुरकर, काशीराम तुरकर, सुरेश तुरकर, निरंजन तुरकर, बालचंद तुरकर, महेंद्र तुरकर, रविशंकर राहंगडाले, जवाहर राहंगडाले, जैपाल भगत, भवन राहंगडाले, सुनिल पटले, संजय पटले, भिकन राहंगडाले यांचे घरे बाधित झाले आहेत. मुरली येथे अंतराम नेवारे, धनराज शरणागत, तेजराम शरणागत, मोरेश्वर शेंदरे, अंतराम धोंडू नेवारे, इसुराम शरणागत, सुनिल रामटेके, गजुराम वाघमारे यांचे घराची पडझड झाली असून भिंती कोसळल्या आहेत. सिंदपुरीत राजेश वासनिक, बिसन राऊत यांचे घराचे नुकसान झाले आहे.

परिसरात १०० हुन अधिक घराची पडझड झाली असल्याची माहिती मिळाली आहे. पूर्णत: घराचे सर्वेक्षण करण्यात येत असले तरी अंशत: घराचे नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदतीची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी, पंचायत समिती सदस्य कंचनलाल कटरे, देवेंद्र मेश्राम, यांनी नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आहे.

धान्याची नर्सरी सडली

संततधार पावसाने शेतशिवारात पाणी साचल्याने धान्य सडले आहे. महागडे बी बियाणे घातल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. तिबार पेरणीचे संकट शेतक-यांवर आले आहे. लागवड करण्यात आलेले धान पिकांची रोवणी वाहून गेली आहे. परंतु नुकसानग्रस्त शेतक-यांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही.

वीज पुरवठा बंद

मंगळवारच्या रात्री पावसाने हजेरी लावताच वीज पुरवठा बंद झाला. पावसाची रिपरिप सुरू होताच परिसरात रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. यामुळे रात्रीचा प्रवास भीतीदायक राहत आहे. देखभाल व दुरुस्ती करण्यात येत नसल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहेत. दिवसभरही वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे

वीज पडून तरुण शेतक-याचा मृत्यू

मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील तरुण शेतकरी शुभम विजय लेंडे (वय २६) मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भात पिकाची लागवड सुरू असल्याने शेतावर गेला होता. जिथे भात रोपांची लागवड सुरू होती त्याच बांधीत वीज कोसळली. यावेळी शुभम पेंड्या शेतात फेकत होता. अगदी त्याच्या शेजारीच वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज होताच रोवणी करणा-या महिला घाबरल्या. त्या महिला रोवणी सोडून मागे फिरत असताना शुभम शेतात कोसळलेला दिसला. त्या महिलांनी त्याला शेतातून बाहेर काढले. घटनेची माहिती गावात होताच गावकरी घटनेच्या दिशेने गेले. त्याला लगेच ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे आणले गेले. पण, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मोहगाव येथील महिला तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शुभमच्या मागे वडील,आई,आजोबा व एक भाऊ असा परिवार आहे.

दरम्‍यान, या घटनेत सविता संजय तलमले (३७), अश्विनी आंबीलकर (२९), नीतू जितेंद्र वानखेडे (३०), भुमेश्वरी संदीप साखरवाडे (२७), रविना विनोद लेंडे (१८), नंदा मोहन बाळबुधे (२८), जनाबाई दशरथ लेंडे (५०), नीला विनोद लेंडे (४०), कविता कैलास देशमुख (३५), वर्षा नरेंद्र लेंडे (२७), सुरेखा प्रमोद लेंडे (३४), पुस्तकला अमर लेंडे (६०), सुमन वामन लेंडे (६०), यमुना मूलचंद लेंडे (६५), सकू मनोहर लेंडे (५८) या महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने भंडारा-तुमसर मार्गावरील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दारे उघडले

गोसेखुर्द धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३३ दरवाज्यांपैकी १२ दरवाजे दीड मिटरने तर २१ दरवाजे एक मिटरने सुरू आहेत. याशिवाय मध्यप्रदेश सिमेवरील राजीव सागर प्रकल्पातील (बावनथडी प्रकल्प) पाणीपातळी वाढल्याने या प्रकल्पाचे पाणी बावनथडी नदीत सोडण्यात आले आहे.

५ तालुक्यात अतिवृष्टी

मागील २४ तासात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. सात तालुक्यांपैकी मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखांदूर या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९५.८ मिमी पावसाची नोंद झाली.

तुमसरात पुरस्थिती

बोरी वितरिकेचे चेंबर लिक झाल्याने नाल्यातील पाणी शेतात शिरल्याने धान पिकाची रोवणी वाहून गेली आहे तर अनेक रस्ते बंद झालेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्रभर आलेल्या पावसामुळे देव्हाडी रोडवरील नाल्यातून पाण्याचा निचरा न झाल्याने तुमसर शहर परिसराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

परिणामी संबधित प्रभागातील सांडपाणी व पावसाचे पाणी निचरा होत नसल्यामुळे तेच बॅकवॉटर नागरिकांच्या घरात शिरले. बावनथडी प्रकल्पाअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या बोरी वितिरीकाचे चेम्बर लिक असल्यामुळे धानपिकाची रोवणी झालेल्या शेतात पाणी शिरल्यामुळे रोवणी झालेले धान पीक पुर्णत: वाहून गेले आहे. यापूर्वी देखील असेच चेंबर लिक झाल्याने शेतक-यांचे उभे धान पीक सडले होते.

वैनगंगा नदीत मनृसिंह मंदिरात १५ भाविक अडकले

दरम्‍यान, वैनगंगा नदीच्या मधोमध असलेल्या नृसिंह मंदिरात दर्शनासाठी आलेले १५ भाविक अडकले आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने हे सर्व भाविक मंदिराच्या वरच्या माळ्यावर गेले. या भाविकांमध्ये ७ महिला आणि ८ पुरुष आहेत. हे भाविक आंधळगाव, मोहाडी, तुमसर, मुंढरी,इत्यादी गावातील रहिवासी आहेत. पाण्याचा प्रवाह जोरात असल्‍याने सर्वांना वरच्या माळ्यावर राहण्यास सूचना देण्यात आल्या. प्रशासनाकडून पुजारीशी बोलणे झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news