

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील करडी (धाड) येथील एका विवाहितेने आपल्या दोन मुलांसह करडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.
करडी गावातील सरिता ज्ञानेश्वर पैठणे(30) या विवाहितेचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगतांना आढळून आला. सरिता ही दोन दिवसांपासून मुलगी वेदिका(11) व मुलगा वंश (9) या दोन्ही मुलांसह बेपत्ता होती. तिने मुलांसह आत्महत्या केली असावी अशी शंका बळावली. परंतु दोन्ही मुलांचा काही थांगपत्ता दिसत नव्हता. अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने धरणाच्या पाण्यात शोधमोहीम राबवल्यावर दुसऱ्या दिवशी वेदिका व वंश दोन्ही भावंडाचेही मृतदेह आढळून आले.
याप्रकरणी मयत सरिताचा भाऊ शरद दामोधर (रा.फर्दापूर, जि. औरंगाबाद) याने धाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आपली बहीण सरिताचा पती ज्ञानेश्वर पैठणे हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. शिवाय तिची सासू व नणंदही सरिताचा सतत शारिरीक व मानसिक छळ करीत होत्या. अखेर या प्रकाराला कंटाळून तिने आपल्या दोन्ही मुलांसह आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून धाड पोलिसांनी मयत सरिताचा पती, सासू व नणंद या तिघांवर गुन्हा दाखल करून पती ज्ञानेश्वर पैठणे याला अटक केली आहे.
हेही वाचा