

टाकळी सिकंदर : पुढारी वृत्तसेवा दोन-तीन वर्षांपासून भीमा सहकारी साखर कारखाना अडचणीत असतानाही सभासद, शेतकर्यांनी भीमा परिवार व महाडिक कुटुंबीयांवर मोठा विश्वास दाखवला. 'भीमा'च्या सभासदांच्या अडीअडचणींसंदर्भात मार्ग काढून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महाडिक परिवार कारखान्याच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहणार, असे प्रतिपादन विश्वराज महाडिक यांनी केले.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वराज महाडिक यांनी बुधवारपासून गावभेट दौरा सुरू केला आहे. यानिमित्त सुस्ते, पेनूर, पापरी, पाटकुल, वडवळ व गोटेवाडी भागाचा त्यांनी दौरा केला. या दौर्यात प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी भेटी घेतल्या. या दौर्यावेळी महाडिक म्हणाले, लोकसभेत व कोल्हापूर जिल्ह्यासाठी खासदार महाडिक यांचे अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य असतानादेखील जिल्ह्यातील खुनशी राजकारणामुळे यांचा पराभव झाला.
खा. धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून भीमा कारखान्याचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. सभासद आणि शेतकरी अशा अडचणीच्या काळातदेखील भीमा परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले. या ऋणातून कधीच उतराई होणे शक्य नसल्याचे विश्वराज महाडिक म्हणाले. यावेळी अनिल गवळी, दत्तात्रय सावंत, हरिदास चवरे, गंगाधर चवरे, देविदास चवरे, सर्जेराव चवरे, तानाजी सावंत, वीरसेन देशमुख, दिलीप काळे, महावीर भोसले, लक्ष्मण सातपुते उपस्थित होते.