

केज; पुढारी वृत्तसेवा : संकट काळात ११२ या नंबरवर फोन करून पोलिसांची तात्काळ मदत घेता येते. परंतु काही अतीशहाणे त्याचा दुरुपयोग करून पोलिस यंत्रणेला वेठीस धरतात. अशाच दोन मद्यपींना केज पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखविला आहे. केज तालुक्यात वाळू चोरी होत असल्याची खोटी माहिती देणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील रात्र गस्तीवरील पोलीस पथकाच्या ११२ क्र. वर केज तालुक्यात वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. शिवकुमार घाडगे आणि त्याचा मित्र आश्रुबा चव्हाण यांनी ही माहिती दिली होती. माहीती मिळताच पोलीस नाईक राजू गुंजाळ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे आणि गृह रक्षक दल जवानांचे पथक तात्काळ लाखा येथे पोहोचले. पोलिसांनी आश्रुबा व शिवकुमार यांचा शोध घेऊन वाळू चोरी कोठे होत आहे? याची विचारणा केली असता ते हसू लागले. त्या दोघांनी दारूच्या नशेत खोटी माहीती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची उपजिल्हा रुग्णालय केज येथे वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्रुबा व शिवकुमार हे दारूच्या नशेत असल्याचे सांगितले. वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश सानप यांच्या फिर्यादीवरून त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :