RBI repo rate hike | रेपो दरवाढीचा कर्जदारांना फटका! गृहकर्जाचा मासिक हप्ता २३ टक्क्यांनी वाढणार | पुढारी

RBI repo rate hike | रेपो दरवाढीचा कर्जदारांना फटका! गृहकर्जाचा मासिक हप्ता २३ टक्क्यांनी वाढणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज बुधवारी (दि. ७) पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात ३५ बेसिस पॉइंट्सची (bps) वाढ (RBI repo rate hike) केली आहे. या वर्षीच्या मे महिन्यापासूनची ही सलग पाचवी रेपो दरवाढ आहे. आजच्या निर्णयामुळे रेपो दर ५.९ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर गेला आहे. या रेपो दर वाढीचा सर्वाधिक फटका कर्जदारांना बसला आहे. सध्या जे कर्जदार आहेत. विशेषतः ज्यांनी फ्लोटिंग रेट आधारावर गृह कर्ज घेतले आहे; त्यांचा सध्याच्या रेपो दर वाढीमुळे मासिक हप्ता (EMI) आणखी वाढणार आहे. तसेच नवीन कर्जदारांनाही कर्जासाठी जास्त EMI भरावा लागणार आहे.

द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गृहकर्जाच्या हप्त्यावर होणारा परिणाम हा मुख्यतः कर्जाच्या उर्वरित कालावधीवर अवलंबून असतो. या वर्षीच्या मे पासून रेपो रेट २.२५ टक्क्यांनी वाढला आहे. जर कर्जाचा उर्वरित कालावधी जितका जास्त असेल तितका EMI ची टक्केवारी वाढणार आहे. या वर्षी मार्चमध्ये २० वर्षांच्या कालावधीसाठी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि त्याचा या वर्षी एप्रिलमध्ये व्याजदर ७ टक्के असेल तर जानेवारी २०२३ मध्ये तो ९.२५ टक्क्यांवर जाईल. परिणामी मूळ कालावधीत कर्जाची परतफेड करण्यासाठी ईएमआय सुमारे ४ हजार रुपयांनी वाढणार आहे. कर्जाच्या हप्त्यातील ही वाढ १७.७५ टक्के असेल. जर कर्ज परतफेडीचा कालावधी ३० वर्षांचा असेल तर तुमचा EMI सुमारे २३ टक्क्यांनी वाढू शकतो.

कमी कालावधीच्या कर्जावर याचा परिणाम खूप कमी असेल. जर कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्षांचा असेल तर EMI ची वाढ केवळ ९.९६ टक्के असणार आहे. या वर्षी मे पासून आरबीआयकडून रेपो दरवाढ सुरु आहे. आज केलेली रेपो दरवाढ ही ८ महिन्यांतील पाचवी आहे. याआधी ३० सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या RBI च्या पतधोरण बैठकीपर्यंत रेपो दर ५.९ टक्क्यांपर्यंत होता. महागाई कमी होत नसल्याबद्दल केंद्र सरकारने आधीच चिंता व्यक्त केली होती. अद्यापही महागाई नियंत्रणात आलेली नाही.

यंदाच्या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.८ टक्के राहील, असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. पॉलिसी दर अनुकूल राहील. पुढील १२ महिन्यांत महागाई दर ४ टक्क्यांच्या वर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट आहे. पण भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे. अन्नधान्याचा तुटवडा आणि इंधनाच्या वाढत्या किमतींचा गरीब लोकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धामु‍ळे जागतिक पातळीवर महागाई उच्च स्तरावर आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे.

ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ साठी GDP वाढीचा अंदाज ४.४ टक्के इतका खाली राहिला आहे. तर जानेवारी-मार्च २०२३ दरम्यान जीडीपी वाढीचा अंदाज ४.२ टक्के राहणार आहे. एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत अन्नेतर (नॉन फूड) क्रेडीट १०.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते १.९ लाख कोटी रुपये होते, असे दास यांनी सांगितले. (RBI repo rate hike)

दरम्यान, किरकोळ महागाई दर हा आरबीआयने पतविषयक धोरण ठरवताना विचारात घेतलेल्या प्रमुख घटकांपैकी एक असतो. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर ६.७७ टक्क्यांवर होता, जो आरबीआयच्या अंदाजापेक्षा अधिक होता. (RBI Monetary Policy)

हे ही वाचा :

Back to top button