

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी तूर्तास लॉकडाऊन अथवा जिल्हाबंदी केली जाणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचाही सरकारचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून कोरोना उपाययोजना आणि अंमलबजावणीचा आढावा घेतला व अंमलबजावणी अधिक कडक करण्याच्या सूचना केल्या.
टोपे म्हणाले, या आढावा बैठकीत पवार यांनी सध्याची परिस्थिती, त्यावरचे उपाय आणि निर्बंध, याबाबतची माहिती घेतली. गर्दी रोखण्यासाठीचे नियोजन, अनावश्यक कारणांमुळे वाढणारे रुग्ण, तरुणवर्गाकडून रेस्टॉरंट व मॉलमध्ये होत असलेली गर्दी, यावरही बैठकीत चर्चा झाली. गर्दी कमी करण्याबाबत काय उपाययोजना केली पाहिजे, यावरही पवार यांनी काही सूचना केल्या. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर बैठकीत एकमत झाले.
मुंबई आणि राज्यातील 80 टक्के बेडस् रिकामे आहेत. संख्या वाढत असली, तरी ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. मृत्यूचा आकडा वाढलेला नाही, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे टोपे यांनी पवार यांना सांगितले.
राज्यात मुंबई, पुणे, ठाणे यासह काही ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील महाविद्यालये ऑनलाईन सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या निर्णयानंतर विद्यार्थी घरातच थांबले पाहिजेत. ते अन्य ठिकाणी फिरत राहिले, तर आपला उद्देश साध्य होणार नाही, असेही पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दररोज चर्चा करतात. रोज सकाळी सात वाजता त्यांची फोनवर एकमेकांशी सविस्तर चर्चा असते. त्यामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने त्यांनी आरोग्य विभागाकडून अधिकची माहिती घेतली आहे, असे टोपे यांनी सांगितले.शरद पवार यांना कोरोना लस घेऊन 9 महिने झाले आहेत. कदाचित 10 जानेवारीला ते बूस्टर डोस घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनवर चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी निर्बंधांबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर गुरुवारीदेखील काही चर्चा झाली. गुरुवारच्या बैठकीत वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू या पर्यायांवर चर्चा झाली. याबाबत पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे योग्य निर्णय घेतील. शासन घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचलं का?