

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे होणा-या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांना भीडणार आहेत. आयसीसीने या सामन्याची तारीख निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील सामना हा नेहमीच हाय व्होल्टेज सामना असतो. सूत्रांच्या माहितीनुसार उभय संघादरम्यानचा हा सामना दुबई येथे २४ ऑक्टोबरला खेळवला जाईल. असे असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अद्याप वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला गेला होता. तो सामना टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळला गेला होता. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ ५ वेळा आमनेसामने आले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
एकूण टी २० सामन्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८ सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने ७ आणि पाकिस्तानने एक सामना जिंकला. एक सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारताने त्या सामन्यात बॉल आउटवर रोमहर्षक विजय मिळवला. तो सामना पहिल्या द. आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमधील होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मागिल महिन्यातच आगामी टी-२० वर्ल्डकपचे गट जाहीर केले. सुरुवातीला पात्रता फेरी होणार असून यात आठ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
त्यानंतर मुख्य स्पर्धेत एकूण १२ संघांचा दोन गटांमध्ये समावेश असणार आहे. भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे.
त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
गट २ मध्ये भारत, पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. तसेच पात्रता फेरीतील दोन संघ या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.
यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतामध्ये होणार होता. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने आयसीसीला ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे हलवणे भाग पडले आहे. परंतु, या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयने आपल्याकडे राखले आहेत. यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.