

उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी हद्दीतील 'हॉटेल 96'मध्ये हुक्का पार्लरवर गोकुळ शिरगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकून सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेल मालक सूरज शिवाजी शिंदे (रा. मिरजकर तिकटी कोल्हापूर) याच्यासह सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रोहित राजकुमार मनचुंडिया (27, रा. शाहूपुरी रेल्वे स्टेशन), सनी रुपेश सलोजा (24, रा. ताराबाई पार्क, कृपलानी हॉस्पिटलजवळ), सुधीर चंद्रलाल पोपटानी (25, रा. गांधीनगर सिंधू मार्केट), अक्षय अशोक गिडवाणी (25, महावीर गार्डन, नागाळा पार्क), सूरज शिवाजी शिंदे (रा. मिरजकर तिकटी, कोल्हापूर), सुशांत गंगाराम नलवडे (20, रा. राजारामपुरी 14 वी गल्ली) आणि शुभम राजू पाटील (22, रा. राजारामपुरी आठवी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.
सूरज शिंदे याचे हॉटेल 96 कोप या नावाने हॉटेल असून येथे हुक्का पार्लरचा अड्डा सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. शुक्रवारी रात्री दहा वाजता स.पो.नि. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का साहित्य, मोबाईल, कार असा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस हौसिंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे.