

कसारा घाटात बुधवारी २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्ग आणि महामार्गावर महाकाय दरडी कोसळल्या. यामुळे मुंबई नाशिक रेल्वे मार्गासह महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.
रात्री ७:३० च्या सुमारास मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटात ४ ठिकाणी महाकाय दरडी पडण्याच्या घटना घडल्या. परिणामी दरड कोसळल्याने मुबई – नाशिक लेन बंद करण्यात आली. नाशिककडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरून सुरु करण्यात आली.
दरडी कोसळल्याचे समजताच महामार्ग पोलीस, कसारा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. २ तासानंतर देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल कंपनीकडून मदत उपलब्ध होत नसल्याने आपत्ती टीम व पोलिसांनी समृद्धी महामार्ग व्यवस्थापनची मदत घेतली.
त्यांच्याकडील मशिनरीच्या साह्याने दरड हटवण्यात आली. तब्ब्ल ३ तासानंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
याच दरम्यान रेल्वेच्या कसारा – इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान कसारा रेल्वे घाटात २ ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. मातीचा मलबा रेल्वे ट्रकवर वाहून आला. तसेच लूप लाईनच्या रेल्वे ट्रॅक खालील मातीचा भराव वाहून गेला.
त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली. घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी यांनी मदतकार्य सुरु केले. मलबा हटविण्याचे काम अजूनपर्यंत सुरु होते. परिणामी यामुळे कसारा रेल्वे स्थानकात मुबईहून नाशिक सह लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.
रात्री ९.२० च्या सुमारास मुसळधार पावसामुळे कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील उंबरमाळी रेल्वे स्थानकात पाणी भरले होते. यामुळे रेल्वे रुळाखालील भराव देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूक अनिश्चित काळसाठी बंद करण्यात आली होती.
उबरमाळी रेल्वे स्थानकातील पाणी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमला सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदत केली. दरम्यान रात्री ८ ते दुपारी 2 वाजेपर्यंत कुठलीही रेल्वे वाहतूक सुरु झाली नव्हती. त्यामुळे कालपासून गाडीत अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले.
पाहा व्हिडिओ : गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट