

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंसाचारावरून आसाम आणि मिझोराम यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हेमंत बिसवा सरमा हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असून भाजपने त्यांना संधी दिली आहे.
गेल्या महिन्याभरापासून पूर्वेकडील आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये तणाव वाढला आहे.
या तणावाचे रुपांतर हिंसाचारात झाले आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमेवर झालेल्या गोळीबारात ५ आसाम पोलिसांचा मृत्यू झाला.
तर एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे.
आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषेवरील कचर भागात काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. यात आसामच्या पाच पोलिसांचा मृत्यू झाला.
पोलिस अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झाले. या प्रकरणात शुक्रवारी आसाम प्रशासनाने मिझोरामच्या संबंधित कोलासिब जिल्हा प्रशासनातील सहा अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली.
त्याशिवाय, मिझोरामचे राज्यसभेतील एकमेव खासदार के. वनलेवना यांना देखील नोटीस दिली आहे.
एकीकडे आसामने शुक्रवारी मिझोराममधील पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली, तर दुसरीकडे मिझोरामनं चक्क आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल केला आहे.
ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, त्याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री आणि इतर सहा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सरमा यांच्यासह आयजीपी अनुराग अगरवाल, कचरचे डीआयडी देवज्योती मुखर्जी, कचरचे किर्ती जल्ली, कचरचे डीएफओ सुन्यदेव चौधरी, कचरचे एसपी वैभव निंबाळकर, ढोलाई पोलिस स्थानकाचे ओसी साहब उद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पहा व्हिडिओ: महाडचा पूर