माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सांगोल्यात होणार अंत्यसंस्कार | पुढारी

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सांगोल्यात होणार अंत्यसंस्कार

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील पेनूर गावचे सुपुत्र तथा सांगोला तालुक्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे पेनूर गावावर शोककळा पसरली आहे. शनिवार ३१ जुलै रोजी त्यांचे पार्थिव पेनूर येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. यावेळी अंत्यदर्शनासाठी पेनूर नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्याने १६ जुलै पासून सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे वृत्त कळताच पेनूर सह सांगोला तालुक्यातील जनतेवर शोककळा पसरली.

शनिवारी सकाळी आबासाहेबांचे पार्थिव पेनूर येथे अंत्यदर्शनासाठी आणले होते.

त्यानंतर सव्वा आठ वाजता रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव सांगोलाच्या दिशेने रवाना झाले. काही वेळातच त्यांचे पार्थिव सांगोला शहरात दाखल होणार आहे.

सांगोला येथे निवासस्थानी आज सकाळी ९:३० ते सकाळी ११:३० पर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

सकाळी ११:३० वा. आबासाहेबांच्या पार्थिवाच्या अंत्ययात्रेस सुरवात होईल.

आज दुपारी १ वा. शेतकरी सह. सूतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

सध्या बाबासाहेबांचा पार्थिवा सोबत त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख हे असून पेनूर येथील नागरिक देखील मिळेल त्या वाहनाने सांगोलाकडे जाताना दिसत आहेत.

सध्याचे राजकारण पाहता राजकारणासह राजकारणीही झपाट्याने बदलत आहेत. माणसांची मनं आणि मतं देखील बदलत आहेत.
मात्र या बाजारात बदलले नाहीत, ते फक्त आबासाहेब!! अशी भावना पेनूरमधील नागरिकातून व्यक्त केली जात होती.

Back to top button