

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळी चोरी केल्याच्या संशयातून ही घटना घडली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील काही दिवसापूर्वी शेळी आणि कबुतर चोरीला गेले होते. चोरीचा संशय या चार तरूणांवर होता. यावरून काल शुक्रवारी सकाळी चार तरुणांना त्यांच्या घरातून उचलून नेत त्यांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहीती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेत हे तरुण जबर जखमी झाले आहेत.
जखमी तरुणांना शिरापूर येथील कामगार हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी हाॅस्पीटलमध्ये जावून या तरुणांची भेट घेतली आहे. संबधीत मारहाण करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा