पिंपरी : अग्निशमन यंत्रणेकडे सोसायट्यांचे दुर्लक्ष | पुढारी

पिंपरी : अग्निशमन यंत्रणेकडे सोसायट्यांचे दुर्लक्ष

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे, काही सोसायट्यांमध्ये बाल्कनी बंदिस्त करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ज्या सदनिकांच्या बाल्कनी बंदिस्त केलेल्या आहेत, तेथे मदत पोहोचविण्यात अग्निशमन यंत्रणेला अडथळे निर्माण होऊ शकतात. काही सोसायट्यांमध्ये प्रवेशद्वारातूनच अग्निशामक दलाचे वाहन आत पोहोचत नसल्याची माहिती आहे. या सर्व बाबी आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची घंटा ठरू शकतात.

सोसायट्यांमध्ये अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष

शहरामध्ये सुमारे साडेतीन हजारांपेक्षा अधिक सोसायट्या आहेत. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अडचण उद्भवू नये म्हणून अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवली जाते. मात्र, बर्‍याच सोसायट्यांमध्ये एकदा ही यंत्रणा बसविल्यानंतर त्याची दर सहा महिन्याने तपासणी केली जात नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे, काही सोसायट्यांमध्ये सदनिकाधारक बाल्कनी बंदिस्त करतात. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाचे वाहन आणावयाचे झाल्यास त्यासाठी सोसायटी परिसरात पुरेशी मोकळी जागा ठेवली जात नाही. काही सोसायट्यांमध्ये एकच जिन्याची सोय आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित जिन्यातच आग लागल्यास नागरिक इमारतीत अडकून राहू शकतात.

24 मीटरपेक्षा उंच इमारतींना फायर एनओसी

पालिका अग्निशामक दलाकडून दिवसाला दररोज 1 ते 2 फायर एनओसी दिल्या जातात. जुलै महिन्यात एकूण 76 एनओसी देण्यात आल्या आहेत. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसी रुल) 24 मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी फायर एनओसी घेणे बंधनकारक आहे. यापूर्वी 15 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना फायर एनओसी आवश्यक होती.

फायर एनओसी देण्याची प्रक्रिया

अग्निशामक दलाकडून इमारतींसाठी सुरुवातीला तात्पुरत्या स्वरुपात फायर एनओसी दिली जाते. साईड मार्जिनसाठी असलेली मर्यादा, इमारतीची उंची, इमारतीत रिफ्युजी एरियाची सोय आहे का, भूमिगत पाण्याची टाकी, रायझर यंत्रणा अशा विविध बाबींची पूर्तता झाल्यानंतर अंतिम फायर एनओसी देण्यात येते.

अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे गरजेचे

इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे का, हे दर सहा महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे. इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी विकसकाकडे असल्यास त्याने ही काळजी घ्यायला हवी. जर, सोसायटीकडे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सुपूर्द केलेली असेल तर सोसायटीने ही काळजी घेणे गरजेचे आहे.

अग्निशमन विभागाकडून दिल्या जातात सूचना

सोसायट्यांमध्ये जर अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवली जात नसल्याच्या तक्रारी सोसायटी सदस्यांकडून प्राप्त झाल्या तर त्याबाबतच्या तक्रारींची शहानिशा अग्निशामक दलाकडून केली जाते. त्याचप्रमाणे, तक्रारींचे निराकरण कसे होईल, या दृष्टीने काळजी घेतली जाते, अशी माहिती महापलिका अग्निशामक दलातील एका अधिकार्‍याने दिली.

कामकाजाचे व्हावे वाटप

महापालिका अग्निशामक दलातील एका उप-अधिकार्‍याकडेच फायर एनओसीची जबाबदारी सोपविलेली आहे. दलातील अन्य अधिकार्‍यांकडेदेखील त्याच्या कामकाजाचे वाटप व्हायला हवे. जेणेकरून या कामाला गती मिळू शकेल.

सोसायट्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याकडे रहिवाशांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बर्‍याचदा नोकरीनिमित्त बाहेर जाणार्‍या रहिवाशांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एखादी एजन्सी नियुक्त करून त्यांच्यामार्फतदेखील दर तीन महिन्याने अग्निशमन यंत्रणेचा डेमो घेणे शक्य आहे. शहरात ज्या भागांमध्ये लोकसंख्येची घनता वाढली आहे, तेथे अग्निशामक दलाकडून स्वतंत्र केंद्र उभारणे गरजेचे आहे.

– दत्ता देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

हेही वाचा

नवी सांगवी : डोरेमॉन, रॉकेट, चंद्रयान राख्यांनी सजली बाजारपेठ

पिंपरी : पालिका, जलसंपदाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा

वडगाव मावळ : धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुधारित अहवाल सादर करा

Back to top button