

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यशराज मारुती मुळे या 12 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेत अचानक हृदयविकाराचा झटका आला. गंभीर अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता हृदयाची क्रिया बंद झाल्याचे लक्षात आले. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत मुलाला जीवनदान दिले. रुग्णालयात पोहचल्यावर मुलाचे हृदय प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी ताबडतोब जीवरक्षक सीपीआर दिला आणि अर्ध्या तासातच हृदय पुन्हा धडधडू लागले. मुलाला जन्मजात हृदयविकार असल्यामुळे धमनीची झडप बंद होती. बालरोग हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून धमनी खुली केली.
रुग्णाला दोन महिने वैद्यकीय पथकाच्या बालरोग अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि मेंदूला कमी रक्तप्रवाह झाल्यामुळे तो सुमारे दीड महिना कोमामध्ये होता. त्यामुळे त्याला बरे होण्यास अधिक वेळ लागला. मुलगा हळूहळू कोमातून बाहेर आला आणि 4 सप्टेंबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
आधुनिक वैद्यकीय औषधे आणि बालरोग विभागाच्या सहयोगाने शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परिस्थितीची गरज ओळखून मुलावर तातडीची बलून व्हॅल्व्होटॉमी करण्यात आली. हायपोक्सियामुळे झालेल्या हृदयविकारातून आणि कोमातून त्याला पूर्णपणे बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
– डॉ. प्रशांत उदावंत, सल्लागार बालरोगतज्ज्ञ
हेही वाचा