

जोगेश्वरी (मुंबई); पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव आरे कॉलनीत एका ज्येष्ठ महिलेवर बिबट्याने हल्ला केला. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. आरे कॉलनीत (बुधवार) रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एका ज्येष्ठ महिलेवर बिबट्याचा हल्ला झाला. यावेळी महिलेने प्रतिकार केल्यामुळे त्यात ती महिला सुदैवाने बचावली. ज्येष्ठ महिलेवर बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या महिलेचे नाव निर्मलादेवी रामबदन सिंग असल्याचे समोर आले आहे. सदर महिला घराच्या बाहेर बसली होती. याच दरम्यान अचानक घराच्या बाजूला लपून असलेल्या बिबट्याने महिलेवर झडप घातली. यावेळी दोन ते तीन वेळा त्याने महिलेवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याने महिलेवर अचानक केलेल्या या प्राणघात हल्ल्यात महिलेच्या मानेला गंभीर जखम झाली. बिबट्याने अचानक केलेल्या हल्लात महिला गंभीर जखमी झाली. महिलेचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतली. तेव्हा बिबटया जंगलात पळून गेला. बिबट्याने महिलेवर हल्ला केलेले सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, यामुळे आरे कॉलनी मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.