पतीच्या निधनानंतर पत्नीची आत्महत्या | पुढारी

पतीच्या निधनानंतर पत्नीची आत्महत्या

मंगळवेढा ; पुढारी वृत्तसेवा : मंगळवेढा येथील पती आप्पासाहेब रावसाहेब कोरे (वय 28) यांच्यावर न्यूमोनियामुळे उपचार सुरू होते. त्यांचे बुधवारी (दि. 29) निधन झाल्याचे समजताच पत्नी अनुसया (33, रा. शारदानगर) यांनी सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मंगळवेढ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

येथील आप्पासो कोरे यांना न्यूमोनियासद़ृश आजार झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावतच गेली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दोन दिवसांपासून त्रास वाढत गेला. आप्पासो कोरे यांचा बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला.

पतीच्या उपचारादरम्यान केलेला खर्च व त्यांना वाचवण्यात आलेले अपयश यामुळे पत्नी अनुसया नैराश्यात गेल्या. त्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेखाली उडी येऊन आत्महत्या केली.

कोरे यांच्या आई-वडिलांसह भावाचे यापूर्वीच निधन झाले. आता या दांम्पत्याचाही अंत झाला.त्यामुळे त्यांचा पाच वर्षांचा चिमुकला निराधार झाला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस अधिकारी प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत.

कुटुंब संपले

आप्पासाहेब हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तुटपुंज्या पगारावर प्रपंच भागत नाही म्हणून पत्नी अनुसया ही मोलमजुरी करीत होती. लॉकडाऊन काळात रोजगारही मिळत नव्हता. अशात आप्पासाहेब कोरोना पॉझिटिव्ह आले आणि दवाखाना सुरू झाला. पैसे खर्च होऊनही त्यांचा मृत्यू झाला. हे दुःख सहन न झाल्याने अनुसया यांनीही आपली जीवनयात्रा संपवली.

Back to top button