कोल्हापूर : हसन मुश्रीफ- संजय घाटगे यांची युती कार्यकर्त्यांना पचणार का?

कोल्हापूर : हसन मुश्रीफ- संजय घाटगे यांची युती कार्यकर्त्यांना पचणार का?
Published on
Updated on

मुदाळतिट्टा (प्रा. शाम पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कागल तालुक्यात कधी कुणाला, कुणाचा लळा लागेल, याचे उत्तर कुणालाच देता येत नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी माजी आमदार संजय घाटगे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून 'तुझा गळा माझा गळा' असा संदेश कागलच्या जनतेसमोर सोडला. हा संदेश दोघाही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पचणार काय? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उंदरवाडी (ता. कागल) येथील कार्यक्रमात घडलेल्या स्तुतीसुमनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

तीस वर्षांच्या राजकारणात अपवाद वगळता मुश्रीफांनी आपला सातत्याने पराभव केला. परंतू, झाले ते बरेच झाले, कारण माझा पराभव झाला नसता, तर मुश्रीफांसारखा कर्तृत्वशाली नेता राज्याला मिळालाच नसता. मंत्री मुश्रीफ व आपण ३० वर्षे संघर्ष केला. परंतु, हा संघर्ष कधीच वैयक्तिक पातळीवर नेला नाही. कॉलेजमध्ये एकाच संघाकडून क्रिकेटचे सामने खेळलो. खेळामध्ये जशी हार – जीत असते, तसाच राजकारणातही जय – पराजय ठरलेला असतो. आपण हे पराभव कधीच मनावर घेतले नाहीत. पराभव पचवून प्रत्येकवेळी पुढील निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु मुश्रीफांसारखे नेतृत्व राज्याला मिळावे, असे कदाचित नियतीच्याच मनात असेल, म्हणून प्रत्येकवेळा आपला पराभव झाला. आपल्या अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या उभारणीसाठी मंत्री मुश्रीफांनी मनात कोणताही किंतू न ठेवता मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच अडचणींचा डोंगर पार करत अल्पावधीत कारखाना उभारु शकलो. मुरगुडच्या प्रविणसिंह पाटील व बोरवडेच्या गणपतराव फराकटे यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडताना माझ्या पराभवासाठी त्यांनी जे केले, ते योग्य म्हणत त्यांना धन्यवाद माजी आमदार संजय घाटगे यांनी आपल्या स्तुतीसुमनातून दिले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे व आपल्यातील जुन्या मैत्रीचा दाखला देत, राजकीय संघर्षाला उजाळा दिला. ज्यावेळी माझा पराभव करुन संजय घाटगे विजयी झाले, तेव्हा मी त्यांचे अभिनंदन केले आणि मी विजयी झालो तेव्हा त्यांनी माझे अभिनंदन केले. संजय घाटगे यांच्या कारखाना उभारणीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संजय घाटगे यांच्या कारखान्यामागे केडीसीसी बँकेच्या माध्यमातून मी हिमालयासारखा उभा राहीन, असे सांगत, संजय घाटगे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा कधीही विश्वासघात होणार नसल्याचा शब्द दिला.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांनी भविष्यातील तालुक्याच्या राजकारणात मुश्रीफ – संजय घाटगे युती होण्याचे संकेत दिले काय? येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून या युतीला सुरूवात होईल. आमदारकीच्या राजकीय पटलावर कट्टर विरोधक समजल्या जाणार्‍या मुश्रीफ व संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर असणारा राजकीय दुरावा दूर होऊन ही दोघांची युती कितपत पचणी पडेल हे आगामी राजकीय घडामोडीतून दिसून येईल.

आगामी जि. प. आणि पं. स. च्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवर आघाड्या कशा होतील, यावर देखील बर्‍याच गोष्टी अवलंबून असणार असून या दोघांच्या युतीचा निर्णय पक्षीय आदेश पाळणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news