

पुढारी ऑनलाईन : ठाकरे सरकार पडल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत. सध्याचे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत असल्याचा दावा करत आहेत, तर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचे कर्तेधर्ते आहेत. त्यामुळे शिवसेना हा पक्ष नेमका कुणाचा एकनाथ शिंदेंचा की पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा असा प्रश्न सध्या जनमानसासमोर उभा राहिला आहे.
यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी म्हटले आहे की, विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त असल्याने प्रथम सध्याच्या सरकारला अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. ही निवड एकनाथ शिंदे गट आणि भाजप हे मिळूनच करतील. विधानसभा अध्यक्षांकडे हे अधिकार आहेत की, कोणत्या गटाला विधिमंडळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता द्यायची. सध्या एकनाथ शिंदेंच्या गटात ४६ आमदार तर, उर्वरित ठाकरेंच्या शिवसेनेत १६ आमदार आहेत. सध्याच्या परिस्थितीवरून ज्या गटात सर्वोच्च आमदार आहेत, त्या गटाला अध्यक्ष विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळेल. पण यानंतर प्रश्न निर्माण होतो की ठाकरेंना माणणाऱ्या गटाचे अस्तित्व काय?
विधिमंडळातील पक्ष हा शिवसेना शिंदेंचा असेल तर, बाहेरचा शिवसेना पक्ष हा नेमका कोणाचा? आता ही लढाई ठाकरे सरकारला निवडणूक आयोगापुढे लढावी लागणार आहेत. शिवसेना पक्षामध्ये हा जो पेच निर्माण होईल, त्यासंदर्भात पक्षाचा कायदेशीर सेल किंवा नेतृत्त्व कायदेशीररित्या न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न करेलच. पण यानंतर यामधील दुसरा पक्ष ठाकरे सरकारला निवडणूक आयोगाला आमचाच पक्ष कसा खरा आहे हे पटवून द्यावं लागेल, असेही ते म्हणाले.
यानंतर ठाकरे यांच्यापुढे नेमके कोणते आव्हान आहे यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी काही घटनात्मक बाबी सांगितल्या. ते म्हणाले, आता सरकार कोणाचं हा प्रश्न मिटला आहे, पण यामध्ये पुढे शिवसेनेचा वारसा नेमका कोणाकडे जाणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंकडे हा खरा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणासंदर्भातील अंतिम निर्णय हा निवडणूक आयोग देईल. आत्तापर्यंतच्या घटनांमध्ये पक्षांतर विरोधी कायद्यासंदर्भात खरा पक्ष कोणाचा हा निर्णय निवडणूक आयोगाकडेच राहील. यामध्ये निवडणूक आयोग कोणत्या गटाकडे जिल्हा, राज्यपातळीवर किती आमदार, खासदार, जिल्हा संघटनाप्रमुख आहेत याची पडताळणी प्रक्रीया सुरू करेल.
दोन्ही गटाने शिवसेना आमची असा दावा केल्यास, यानंतरही निवडणूक आयोग हा धनुष्यबाण हे चिन्ह गोठवूही शकतो, एकनाथ शिंदेंच्या गटाकडे हे चिन्ह जावू शकते किंवा निवडणूक आयोग शिवसेना हे नाव गोठवा असे म्हटल्यास शिवसेनाला काहीतरी प्रत्यय लावण्याचे आदेश देऊ शकतात, अशीही शक्यता ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी व्यक्त केली आहे.