

आज सायंकाळी होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० सामन्यांची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली असून प्रदीर्घ कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत ( भारत- पाक सामना ). या हाय होल्टेज सामन्यात कुणाचे पारडे जड असणार याचा फैसला होणार आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने पाकिस्तीन संघाचे कौतुक करत आदर व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक संबंध बिघडल्याने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव आला होता. क्रिकेटचे सामनेही झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर हा सामना होत असल्याने क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
टी-२० या क्रिकेटमध्ये विजयाचे अंतर खूप कमी धावांचे असते. टी-२० क्रिकेटमधील विश्वचषकाच्या आकडेवारीत भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे. शिवाय अटीतटीच्या सामन्यांत भारताने नेहमीच वर्चस्व ठेवले आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानी संघ दडपण घेऊन खेळतो हे आजवर सिद्ध झाले. भारताने सर्व सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. आता प्रदीर्घ कालावधीनंतर रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानच्या बाबर आझमच्या संघाशी सामना करणार आहे.
भारताचे रोहित शर्मा, के. एल. राहुल, कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे सध्या फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या खेळणार असल्याचे विराट कोहली याने सांगितले आहेत. आवश्यकता भासल्यास हार्दिक गोलंदाजी करू शकेल, असेही कोहलीने स्पष्ट केले आहे.
दोन स्पीनर आणि तीन वेगवान गोलंदाजांसह भारत खेळण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा असेल. अश्विन आणि युवा वरुण चक्रवर्ती यांच्या समावेशाबाबतही चर्चा सुरू आहे. वेगवान माऱ्यात जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी हे दोन गोलंदाज खेळू शकणार आहेत. भुवनेश्वर कुमार, शार्दूल आणि राहुल चहर हे तीन गोलंदाज ही भारताची जमेची बाजू आहे. मात्र, ते खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल मानली जात असल्याने प्रथम नाणेफेक कोण जिंकते यावर सामन्याचा निकाल स्पष्ट होतो. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणणे हे प्रत्येक संघाचे धोरण असते.
हेही वाचलं का?