Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण | पुढारी

Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोविड १९ रिपोर्ट (covid 19 report) पॉझिटीव्ह आला आहे. राज यांच्यासह त्यांच्या आईही कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. राज आणि त्यांच्या आईंना कोरोनाची सुक्ष्म लक्षणं असून ते घरीच उपचार घेत असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे.

मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत आहे. मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. असं असतानाच राज ठाकरे यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. सर्वांवर लिलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असल्याचे समजते आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक आणि पुणे दौरे केले होते. या ठिकाणी ते विनामास्क दिसून आले होते. संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही त्यांनी मास्क वापरला नाही. यावरून त्यांच्यावर टीकादेखील झाली होती.

मनसेचा शनिवारी भांडुप तर रविवारी पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याला खुद्द राज संबोधित करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, राज यांची तब्येत यांची तब्येत ठिक नसल्यामुले हे मेळावे पुढे ढकलण्यात आले आहेत.

Back to top button