

टी-२० वर्ल्डकपमध्ये मंगळवारी (दि. २६) पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसर्या विजयाची नोंद केली आहे. ( T20 World Cup 🙂 पाकिस्तानच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेतील भारताचा मार्ग सुकर झाला आहे. भारताला सेमिफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल. विशेष म्हणजे, आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केलेला नाही. यामुळे हा सामना भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप-२ मध्ये ( T20 World Cup : ) भारतासह, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरोधातील सामना गमावला आहे. पाकिस्तानने दमदार खेळीचे प्रदर्शन करत सलग दुसर्या सामन्यातही विजय मिळवला. बलाढ्य न्युझीलंडवर मात केली. पाकिस्तानच्या या कामगिरीमुळे भारताचा सेमिफायनलपर्यंतचा मार्ग आता सुकर झाल्याचे मानले जात आहे.
भारताला सेमिफायनलमध्ये पोहचायचे असेल तर न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल. यानंतर पुढील तीन सामने जिंकले तर भारतीय संघ थेट सेमिफायनलमध्ये धडक मारु शकतो. मात्र न्यूझीलंड विरुद्धचा सामना हरला तर भारताचा मार्ग खूपच खडतर होणार आहे.
ग्रुप -२मधील अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया संघाचा भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सहज पराभव करतील, असे मानले जात आहे. अशातच भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांचा पाकिस्तानने पराभव केला आहे. त्यामुळे आता भारताने न्युझीलंडचा पराभव केल्यास गुणतालिकेमध्ये भारत दुसर्या स्थानी असेल. तसेच उर्वरीत तीन सामने जिंकले तरीही न्यूझीलंडला तिसर्या स्थानावरच समाधान मानावे लागेल.
ग्रुपमधील पहिल्या दोन स्थानांवर असणारे संघ सेमिफायनलमध्ये जातील. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तर ग्रुप 1 मधील प्रथम क्रमांकाच्या संघांबरोबर भारताची सेमिफायनल मुकाबला होईल. ग्रुप 1 मध्ये पहिल्या क्रमाकांवर राहण्यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीव्र स्पर्धा आहे.
भारताचा पराभव केला तर न्युझीलंडचे आठ गुण होतील. गुणतालिकेमध्ये पाकिस्तान अग्रस्थानी कायम राहिल. तर भारतीय संघ तिसर्या स्थानावर फेकला जाईल. भारताचा ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरोधात सामना आहे. यानंतर ३,५ आणि ८ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरोधात सामने हाेतील. विशेष म्हणजे आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवलेले नाही. त्यामुळे भारतासमाेर न्यूझीलंडचे माेठे आव्हान असणार आहे.
ग्रुप २ मध्ये अफगाणिस्तान संघ आहे. हा संघ उलटफेर करण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. २९ ऑक्टोबरला या संघाचा पाकिस्तानशी मुकाबला आहे. तसेच ३१ ऑक्टोबरला नामिबिया, तीन नोव्हेंबरला भारत आणि सात नोव्हेंबर न्यूझीलंड संघाशी अफगाणिस्तान भिडेल. अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा तब्बल १३४ धावांनी पराभव केला. त्यामुळे या संघाचा रनरेट खूपच चांगला आहे. सध्या गुणतालिकेमध्ये अफगाणिस्तान दुसर्या स्थानी आहे. तर न्युझीलंड आणि भारत हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.